मल्हार न्यूज प्रतिनिधी,
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कासारी इथे एका सहा वर्षीय मुलाचा अंत्यसंस्कार ग्रामस्थांनी कोरोना संशयित समजून रोखल्याची घटना काल घडली आहे. आरोग्य प्रशासनानं याबाबत ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर मुलावर अंत्यविधी करण्यात आला.
कासारी इथल्या एका मुलाला हृदयविकार होता. मुंबई इथल्या जे. जे. रुग्णालयात एक महिन्यापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी या मुलाचे निधन झाले. निधनानंतर त्याच्यावर कासारी इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, ग्रामस्थांत कोरोनाच्या भीतीने अस्वस्थता पसरली. ग्रामस्थांनी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी विरोध दर्शवला.
कोरोनासारख्या आजारामुळे देशभरात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेणं आणि नियमांप्रमाणे घरातच राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. लोकांनी काळजी घ्या पण भीती बाळगण्यात काही अर्थ नाही अशा सुचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.