सतत प्रक्रिया उद्योग आणि फार्मासिटिकल कंपन्या कमी मनुष्यबळाचा वापर करून सुरु राहतील

671

गिरीष भोपी, पनवेल

करोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रशासन सर्व पातळयांवर प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील कंपन्या सुरू राहण्याबाबतही प्रशासनाने शासन निर्देशाप्रमाणे काही निर्णय घेतलेले आहेत.

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह पाच सदस्यीय उद्योग समितीने मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या दि.23 मार्च, 2020 च्या कोविड-19 साथीचे रोग अधिनियम 1897 च्या लॉकडाऊन आदेशातील बाब क्र.7, 9 व 12 नुसार व सहसंचालक, उद्योग संचालनालय यांनी दिलेल्या सूचीच्या आधारे जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा आणि उपक्रम त्याचबरोबर सतत प्रक्रिया उद्योग आणि फार्मासिटिकल, एपीआय इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन घटकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या जिल्ह्यात असलेल्या जवळपास 1300 कंपन्या/फॅक्टरींपैकी जवळपास 198 कंपन्या/फॅक्टऱ्यांना त्या सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिली आहे.

मात्र संबंधित कंपन्यांनी कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून आपले औद्योगिक उपक्रम सुरू ठेवायचे आहे, हे सुरू असताना कामावरील कामगारांची वैद्यकीय तपासणी त्याचबरोबर विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचेही त्यांनी सूचित केले आहे.

सतत प्रक्रिया उद्योग आणि फार्मासिटिकल, एपीआय इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन घटक असलेल्या कंपन्या सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे, तसे निर्देश शासनाकडून कंपन्यांना देण्यात आले आहेत. तसेच सुरु राहणाऱ्या सर्व कंपन्यांच्या प्रशासनाने कामगारांची नियमितपणे थर्मल स्क्रीनिंग करावे आणि सामाजिक दूरता (Social Distancing ) पाळावे, अशा सूचनाही संबंधित कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता हे समजून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.