डॉक्टरांनी खाजगी दवाखाने ताबडतोब सुरू करावेत – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

594

पुणे प्रतिनिधी,

सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू करण्याबाबत निर्देश देवूनही बहुतांशी डॉक्टरांनी अद्याप क्लिनीक सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्वरित हॉस्पिटल सुरू करून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद करण्यात आले असले तरी क्लिनीकला यातून सुट देण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे स्पष्ट करून डॉ. म्हैसेकर म्हणाले की, ज्या डॉक्टरांचे वय जास्त आहे आणि त्यांना कुठलाही दुर्धर विकार असेल तर त्यांनी क्लिनीक सुरू केले नाही तरी चालेल, मात्र जे डॉक्टर तंदुरूस्त आहेत ,पण अद्याप दवाखाने सुरू केले नाहीत, ही गंभीर बाब आहे. कोवीड व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत, त्यांना सेवा देणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने बंद रुग्णालयाची माहिती घ्यावी, म्हणजे प्रशासन कार्यवाहीबाबत निर्णय घेईल. कोविडकडे लक्ष देत असताना, अन्य आजाराकडे दुर्लक्ष होता कामा नये, टेली मेडीसीनच्या माध्यमातून डॉक्टरांनी रुग्णांशी संपर्क ठेवावा, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

0000000

 

पुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी
चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई, दि. 27 :- पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून त्यांच्या निर्देशानुसार श्री.अनिल कवडे, श्री,सौरभ राव, श्री. सचिंद्र प्रतापसिंग आणि श्री.कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.
राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयातर्फे आज यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. श्री.अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. श्री. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. श्री. सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त तर, श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे. हे चारही अधिकारी मूळ जबाबदारी सांभाळून पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सेवा देणार आहेत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि व्यापक होऊन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
0000000