ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परंपरा खंडित होऊ नये :- संबंधित घटकांची मागणी

707

अर्जुन मेदनकर,आळंदी

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आयोजना बाबत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने संबंधित घटकां समवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा घडवून आणली.यात सर्व समंतीने श्रींचा सोहळा साजरा व्हावा यात खंड पडू नये तसेच कोरोनाचे पार्श्वभूमीवर विशेष दक्षता व आरोग्याची काळजी घेत तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जाऊन सोहळा साजरा करण्याची मागणी करण्यात आली. मात्र या सोहळ्याचे नियोजन, स्वरुप काय राहील या बाबतचा अंतिम निर्णय राज्य शासना समवेत चर्चा झाल्यानंतर लॉकडाउन चा कार्यकाळ तसेच परिस्थिती नुसार शासनाचे निर्णया नंतर घेतला जाणार आहे.
 अलंकापुरीतून श्रींची पालखी लाखो वारक-यां समवेत आषाढी यात्रेस अखिल वारकरी संप्रदायाचे दैवत पंढरपूर स्थित श्री पांडूरंगरायांचे दर्शनासाठी आळंदी ते पंढरपूर आषाढी एकादशीस पायी वारीला प्रवास  करीत जात असतात. याशिवाय राज्यातील इतर ठिकाणांहून देखील विविध संतांच्या पालख्या हरिनाम गजरात पंढरपूरला जातात.
 श्रींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान जवळ आल्याने शासना समवेत सोहळ्याचे नियोजनासाठी चर्चा करून निर्णय घेण्यापूर्वी संबंधित सोहळ्यातील घटकांची संस्थानने बैठक घेतली. प्रथमच ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात आली. यात चर्चा होऊन सोहळा साजरा करण्यात यावा.मात्र दक्षता घेतली जावी. भाविक वारकरी यांचेसह मार्गावरील लाखो नागरिकांच्या आरोग्याची काळजी
घेतली जावी. यावर शासनाचे मार्गदर्शक निर्णयांची अंबलबजावणी करीत सोहळा साजरा व्हावा अशी चर्चा झाली. सोहळ्याचे नियोजन व स्वरूप यावर अंतिम निर्णय मात्र शासनाचे समवेत चर्चा झाल्या नंतर तसेच राज्यातील आणि देशातील कोरोनाची पार्शवभूमी लक्षात घेऊन घेतला जाणार आहे.

शासन निर्णय काय राहील याकडे वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले आहे.
 कोरोनाच्या समस्येवर उपाय योजना शासनाचे आदेश प्रमाणे सर्व शासकीय अधिकारी,पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग,तसेच स्वयंसेवी संस्था तसेच पदाधिकारी कामकाज करीत आहेत. सोहळा पुणे ,सातारा,सोलापूर या जिल्ह्यातून प्रवास करणार असल्याने त्या त्या वेळ्ची परिस्थिती काय असेल त्यावर संबंधित जिल्ह्याधिकारी,विभागीय आयुक्त तसेच मार्गावरील स्थानिक स्वराज्य संस्था यांचा अहवाल यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामुळे शासन काय निर्णय घेणार यावर सोहळ्याचे भविष्य ठरणार आहे.
 ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक घेतली. यावेळी पालखी सोहळ्या संबंधित घटकांनी चर्चा केली. पालखी सोहळा रद्द होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यात सहभागी समाजाचे आणि वारकरी यांचे आरोग्य लक्षात घेऊन पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने सोहळा साजरा करण्यात यावा. यासाठी शासनाशी चर्चा करून अंतिम निर्णय लवकरात लवकर घेतला जाणार असल्याचे संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.

बैठकीस प्रमुख विश्वस्त अँड विकास ढगे पाटील,विश्वस्त अजित कुलर्णी,योगेश देसाई,लक्ष्मीकांत देशमुख,पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर,राजेंद्र पवार आरफळकर,उर्जितसिह शितोळे सरकार,दिंडी समाज संघटना अध्यक्ष मारुती कोकाटे,सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे,रामभाऊ रंधवे,दादा महाराज शिरवळकर,विठ्ठल महाराज वासकर,माऊली जळगांवकर महाराज,राणा महाराज वासकर आदी उपस्थित होते.