गिरीश भोपी, अलिबाग,रायगड,
–महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या धाेरणानुसार राज्यात अडकलेल्या परराज्यातील व परजिल्ह्यातील मजूर व नागरिकांना स्वगृही पाठविण्यास प्रत्येक तालुक्यातून सुरुवात झाली आहे. महाड एस.टी आगारातून आज पनवेल रेल्वे स्थानक येथे जाण्यासाठी विविध जिल्ह्यामधील मजूरांना घेऊन एक बस मार्गस्थ झाली.
लॉकडाऊन दरम्यान राज्यात विविध ठिकाणी अडकून राहिलेल्या मजूर व नागरिकांची स्वगृही जाण्यासाठी रेल्वे अथवा एसटी बसने व्यवस्था केली जाईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती.त्यानुसार संबंधित तहसील कार्यालयात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास सुरुवात करण्यात येऊन मजूरांची विभागवार नोंदणी सुरू केली आहे.
जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांच्या आदेशानुसार महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी महाड मध्ये अडकलेल्या परराज्यातील मजूरांची नोंदणी करण्यासाठी महाडचे तहसिलदार श्री. चंद्रसेन पवार, गटविकास अधिकारी भूषण जाेशी, मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या नियंत्रणाखाली तालुक्यातील विविध खात्यातील अधिकाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे..
त्यानुसार राज्य परिवहन विभाग नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली महाड एस.टी आगारातून पनवेल रेल्वे स्थानक येथे जाण्यासाठी २२ जणांना घेऊन एक बस सोडण्यात आली.
या बसमधील प्रवासी हे मध्यप्रदेशातील असून पनवेल येथून त्यांचे रेल्वे बुकिंग करण्यात आले आहे. या बसमधील प्रवाशांना जिल्हा व तालुका प्रशासनाकडून पाण्याची बाटली, बिस्किटे व हात धुण्यासाठी साबण पुरविण्यात आले आहेत.
या प्रसंगी तहसिलदार चंद्रसेन पवार, नायब तहसिलदार श्री.कुडल, श्री.घेमूड, आगार व्यवस्थापक श्री.कुलकर्णी, स्थानक प्रमुख शिवाजी जाधव, नोडल ऑफिसर श्री.सरडे आदी उपस्थित होते.
या एसटीतून पनवेल रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या या परराज्यातील मजूरांनी त्यांच्यासाठी केलेल्या या व्यवस्थेबाबत,मदतीबाबत जिल्हा व तालुका प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत.