पिंपरी, प्रतिनिधी :
जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लोकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय बंद असल्याने नागरिकांकडे पैसेच नाहीत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा मिळकतकर महापालिकेने माफ करावा, अशी मागणी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे उपस्थित होते.
अरुण पवार यांनी निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाने जगभर थैमान घातले असून, भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग, व्यवसाय, कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. लोकांच्या हाताला काम नसल्याने लोक हवालदिल झाले आहेत. पैसाच हातात नसल्याने घर कसे चालवायचे याची भ्रांत सध्या नागरिकांना पडली आहे. त्यामुळे मिळकतकर भरण्यासाठी त्यांच्यामागे तगादा लावणे उचित होणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव व संचारबंदी यामुळे नागरिकांचे जीवनमान ठप्प झालेले आहे. उत्पन्नाचे स्त्रोत व आर्थिक व्यवहार बाधित झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महापालिकेने मिळकतकर घेऊ नये. शहरातील सर्व नागरिकांचा मिळकत कर सरसकट माफ करण्यात यावा, अशी मागणी अरुण पवार यांनी केली आहे.