मात्र आता संयम ठेवा…! संयम ठेवा…!

479

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिक काळजीग्रस्त आहे. मात्र या कालावधीतही काही नागरिक सामाजिक जबाबदारी ओळखून इतरांची काळजी घेत त्यांना प्रोत्साहनाने जगण्यासाठी प्रेरित करण्याचे काम करीत आहे.
असाच एक प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी श्री.हरिश्चंद्र पाटील यांनी आपल्या लिखाणातून केलायं.. आपल्यासाठीच…! मात्र आता संयम ठेवा…! संयम ठेवा…! या मनोगतातून..
प्रिय बंधू–भगिनींनो आपल्या राज्यासह देशात गेल्या दोन अडीच महिन्यापासून करोना आजाराने हाहा:कार माजवला आहे. आपण सर्वजण त्रस्त असून एक भयाचे वातावरण सर्वत्र पसरले होते आणि अजूनही आहे. मात्र या संकटसमयी ही वेळ घाबरण्याची नसून संयम राखण्याची आहे. आपण सर्वांनी एकजुटीने या संकटाशी सामना करुन त्यावर मात करीत आपल्यासह देश सुरक्षित ठेवण्याची ही वेळ आहे.
सर्वप्रथम आपण राज्य शासन तसेच केंद्र शासन यांच्या सूचनांचे पालन करुन आजपर्यंत कार्यरत शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्तम सहकार्य केले, तेच पुढेही सुरु ठेवूया. जे आज आपल्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत, ज्यांच्या कुटुंबियांना आपल्या परीने सहकार्य करु या, आपल्यासाठी जे डॉक्टर, पोलीस, महसूल विभाग,जिल्हा परिषद तसेच पत्रकार मंडळी व अन्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना दीर्घ वेळ या कामासाठी द्यावा लागतोय, त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबियांना वेळ देता येत नाही अथवा कमी पडत आहे. या सर्वांना आपण कशी मदत करता येईल, यावर विचार करू या. आपल्या आसपास जर सैनिक बांधवांचे, शासकीय बांधवांचे परिवार राहत असतील अथवा वयोवृध्द दाम्पंत्य राहत असतील तर त्यांना आवश्यक असलेले सामान घेवून येणे अथवा आपल्या घरी अतिरिक्त असेल तर त्यांना द्यावे. यामुळे शेजार धर्म नक्कीच टिकून रा‍हील.
माझी नवतरुणांना विनंती आहे, त्यांनी सद्य:स्थितीत घरकामात मदत करावी तसेच आपल्या आसपास लहान मंडळी असतील तर त्यांना शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक गोष्टी तसेच विविध गोष्टींच्या माध्यमातून त्यांना सामाजिक ज्ञान दयावे. त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून त्यांना चित्रकला, हस्तकला, लेखन, वाचन यांची आवड निर्माण करावी. नवनवीन तसेच जुने झालेले पण मजेशीर असे बैठे खेळ शिकवून त्यांना खेळकर ठेवावे. जेणेकरुन त्यांचा घरातील वेळ उत्साहात जाईल. तसेच आपल्याकडील पुस्तकांचे शेजारी-परिसारातील कुटुंबियांना वाटप करुन वाचन संस्कृती वाढवू या.
दररोज सायंकाळी कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून आपापल्या आराध्य देवतांचे भजन करुन तसेच पसायदान, मनाचे श्लोक म्हणत जनकल्याणासाठी प्रार्थना करु या. मला विश्वास आहे, बांधवांनो शासनाला सहकार्य करुन आपण स्वत:च्या अनमोल जीवालाच मदत करणार आहोत. अर्थात आपण या भयंकर रोगावर मात करुन विजयी होणार यात शंकाच नाही, फक्त मायबाप हो तुम्ही घाबरून जावू नका… सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करा, मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, साबणाने हात वारंवार स्वच्छ धुवा, सर्वांना मदत करा, आनंदी रहा आणि दुसऱ्याला आनंद द्या. लवकरच परिस्थिती सुधारेल, आपण आपले आयुष्य नेहमीसारखे पुन्हा मुक्तपणे जगायला सुरुवात करु. मात्र आता संयम ठेवा…! संयम ठेवा…!

(श्री.हरिश्चंद्र पाटील)
जिल्हाधिकारी कार्यालय,
रायगड-अलिबाग