पुणे प्रतिनिधी,
कोवीड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ॲम्ब्युलन्स मालकांनी रुग्णांची वाहतूक करतांना आकारणी करावयाचे दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत निश्चित करण्यात आलेले आहेत. तसेच निश्चित केलेले दर ॲम्ब्युलन्स मध्ये दर्शनी भागात प्रदर्शित करण्याबाबतही यापूर्वी वृत्तनिवेदन देण्यात आले होते. तसेच रुग्णाची वाहतूक करतांना जास्त दर आकारणी केले बाबत या कार्यालयाने माहे जुलै २०२० मध्ये ॲम्ब्युलन्स
च्या मालकाविरुध्द गुन्हा दाखल केलेला होता व प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारणी करू नये म्हणून सर्व ॲम्ब्युलन्स धारकांना सुचना देण्यात आलेल्या होत्या. तसेच जादा दर आकारणी झाल्यास तात्काळ प्रादेशिक परिवहन कार्यालयास तक्रार नोंदविण्याबाबतही जनतेस आवाहन करण्यात आले होते.
मोटार वाहन क्रमांक एमएच-१२डीटी-३१५८ (Maruti Omni Ambulance) तसेच एमएच-१४सीडब्लू ०५१३ (Traveler Cardiac Ambulance) या ॲम्ब्युलन्स धारकांनी रुग्णाकडून जास्त भाडे घेतल्याची तक्रार जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडे प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित वाहन मालकांविरुध्द तात्काळ कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले. या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथील वायुवेग पथकाने नमूद दोन्ही ॲम्ब्युलन्स ताब्यात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे अटकावून ठेवलेल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित वाहनांविरुध्द मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कारवाई करण्यात आलेली आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ॲम्ब्युलन्सच्या वापरानुसार व प्रकारानुसार किती भाडे देण्यात यावे याची माहिती देण्यात येत आहे. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्त पेशंटची संख्या वाढत असल्याने ठरवून दिलेल्या
प्रमाणेच दर आकारणी करण्यात यावी याबद्दल सर्व ॲम्ब्युलन्स चालकांना आदेशित करण्यात येत आहे.
रुग्णवाहिकांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारल्यास तात्काळ प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे तक्रार दाखल करावी. या तक्रारीनुसार तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी कळविले आहे.