संबंधितांवर मानहाणीचा दावा दाखल करणार
पिंपरी, प्रतिनिधी :
जुनी सांगवीतील निर्माण आंगण उष:काल सोसायटीचे बांधकाम पूर्ण झाले असून, नऊपैकी चार ते पाच फ्लॅटधारकांनी लेखी अर्ज देऊन फ्लॅटचा ताबाही घेतला आहे. मात्र, काहीजण केवळ राजकीय हेतू व ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने दोन फ्लॅटधारकांना सोबत घेऊन खोटे आरोप करीत आहेत.
आजपर्यंत आपण कोणत्याही फ्लॅटधारकाला दमदाटी किंवा अरेरावीची भाषा केलेली नाही. तरीही काहीजण केवळ आपला राजकीय हेतू व ब्लॅकमेल करण्यासाठी खोटे आरोप करीत आहेत. वस्तुत: इमारतीचा रिवाईज प्लॅन व भाग भोगवटा प्रमाणपत्रासाठी आपण अर्ज केला होता. पण काही राजकीय पार्श्वभूमि असलेल्या व्यक्तींनी महापालिकेकडे रिवाईज प्लॅन व भाग भोगवटा प्रमाणपत्र मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. यामागे त्यांचा बांधकाम पूर्णत्वास जावू नये, असाच हेतू होता. पोलिसांनी चार्ज शीट दाखल करण्यात वेळ घालविला, असे म्हणणेही चुकीचे आहे. कारण एफआयआर दाखल केलेल्या व्यक्तीने हे प्रकरण तडजोड करून सामंजस्याने मिटवून घेऊ, असे तत्कालिन पोलिस अधिकार्यांसमवेत झालेल्या चर्चेदरम्यान ठरले होते. तसेच न्यायालयानेही सुनावणी घेत सदर तक्रार ही फौजदारी स्वरुपाची नसून, दिवाणी स्वरुपाची असल्याने सदर तक्रार डिस्पोज करण्यात आली आहे, असा खुलासा बांधकाम व्यावसायिक रवींद्र चव्हाण व कमलेश चासकर यांनी केला.
इमारतीचे बांधकाम अपूर्ण असल्याचे सांगत आणि दमबाजी करीत असल्याचे सांगत काहीजण आर्जव करीत आहेत. त्यांनी हे पाहावे की इमारतीचे काम अपूर्ण असेल तर इतर चार पाचजणांनी फ्लॅटचा ताबा कसा काय घेतला ? त्यामुळे आरोप करणार्या काहींचा यामागे केवळ ब्लॅकमेल करण्याचा हेतू असल्याचे सिद्ध होत आहे. सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण असून, कोणतीही काम अद्याप बाकी नाही. तरीही फ्लॅटचा ताबा देत नाहीत, असा खोटा आरोप करणे चुकीचे आहे.
आपली व आपल्या कंपनीची नाहक बदनामी केल्यामुळे आपण संबंधितांवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे.