MH12, MH14 वाहनांची टोल सवलत बंद

1095

 खेड शिवापूर , प्रतिनिधी

पुण्यातील खेड-शिवापूर टोल नाक्यावर एम एच 12 आणि एम एच 14 या वाहनांची टोलमाफी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) बंद करण्यात आली आहे.पुणे सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे पूर्ण झाल्याने आम्ही ही टोलमाफी बंद केली आहे. 1 मार्च पासून या वाहनांना टोल आकारण्यात येत आहे, असे ‘एनएचएआय’कडून सांगण्यात आले.
पुणे सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची रखडलेली कामे वेळेत पूर्ण करावीत आणि खेड शिवापूर टोलनाका ‘पीएमारडीए’च्या हद्दीबाहेर हलविण्यात यावा, या मागणीसाठी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने तीन वर्षांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी या मागण्यांसंदर्भात केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत हवेली (पुणे शहर+पिंपरी चिंचवड), भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर या पाच तालुक्यातील वाहनांना टोलमाफी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन ‘एनएचएआय’कडून देण्यात आले होते. तेव्हापासून खेड शिवापूर टोल नाक्यावर या पाच तालुक्यातील वाहनांना टोल आकारण्यात येत नव्हता. मात्र 1 मार्च 2022 पासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर एम.एच.12 आणि एम.एच.14 या वाहनांना टोल आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

याबाबत पुणे सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटीया म्हणाले, “रस्त्याची कामे पूर्ण झाली असून वाहतुकीस कुठेही अडथळा होत नाही. त्यामुळे एम.एच. 12 आणि एम.एच.14 च्या वाहनांना टोल घेण्यात येत आहे. रस्त्याची कामे पूर्ण झाली असून टोल द्या अशी आम्ही विनंती करत आहोत. तर टोलनाका पुढे हटविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरचा आहे. त्याचा टोलमाफीशी काहीही संबंध नाही.”
“तर रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे एम.एच.12 आणि एम.एच.14 वाहनांकडून टोल आकारण्यात येत आहे. तसेच स्थानिक नागरीकांच्या वाहनांसाठी मासिक पास उपलब्ध आहेत,” असे ‘एनएचएआय’च्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

याबाबत खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटकर म्हणाले, “खेड-शिवापूर टोलनाका ‘पीएमारडीए’ हद्दीबाहेर हलविण्यात यावा, ही आमची मुख्य मागणी आहे. जोपर्यंत टोलनाका येथून हटत नाही तोपर्यंत टोलमाफीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. याविषयी लवकरच आंदोलन केले जाईल.”