मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा !
मुंबई दि. 16, पर्यावरणपूरक होळीचे आयोजन आणि नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदाची धुळवड साजरी करूया असे आवाहन करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
होळीमध्ये वाईट विचार आणि कृतीचे दहन केले जाऊन सुविचारांची पेरणी केली जाते. हीच परंपरा आपण विविध स्वरूपात पुढे नेत असतो. २१ मार्च हा दिवस आपण जागतिक वन दिन म्हणून साजरा करतो. आपण ज्याला वातावरणीय बदलाचे परिणाम म्हणतो आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर भाष्य करतो तेंव्हा त्याची सगळी उत्तरे आपल्याला “वनात” मिळतात. आपल्याला आरोग्यसंपन्न आयुष्याचा निरोगी श्वास देणारी ही सृष्टी आता दृष्टीआड करून चालणार नाही. त्यामुळेच जेंव्हा आपण होलिका दहनाचा विचार करतो तेंव्हा त्यासाठी वृक्षतोड होणार नाही, निसर्गरंगांची जपणूक होईल, याची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
आपण झाडं लावा, झाडं जगवा असा संदेश देतो. हा संदेश खऱ्याअर्थाने प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि त्यासाठी ठोस कृती करण्यासाठी होळीसारखा दुसरा सण असूच शकत नाही. आता दृष्टीआड सृष्टी असं न म्हणता, जागरूकदृष्टीने या“सृष्टी”कडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. असेही मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात.
…