पुणे प्रतिनिधी,
जागतिक पुरस्कार विजेते सोलापूरचे शिक्षक रणजीत डिसले यांनी राजीनामा दिला आहे. 6 जुलै रोजी रणजितसिंह डिसले यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्यासंदर्भातील पत्र शिक्षण विभागाकडे दिले आहे. डिसले यांच्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
याबाबत ग्लोबल टीचर रणजीत डिसले यांच्या समर्थनार्थ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेलं हे पत्र महाराष्ट्राला अंतर्मुख करायला लावणारं आहे. याबातचे पत्र जशाच्या तसे
प्रिय रणजित डिसले,
तू राजीनामा दिल्याची बातमी काल पेपरात वाचली .
खूप आनंद झाला.
बरे झाले तू आमच्या व्यवस्थेतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतलास..
अन्यथा तुला सळो की पळो आम्ही करणारच होतो….
आणि काय करायचे बाकी ठेवले….?
एका जागतिक दर्जाच्या शिक्षकाला राज्यातील सर्वात मोठा गुन्हेगार शिक्षक म्हणून बदनाम केले….
आणखी खूप काही करू शकतो
आमच्या या व्यवस्थेत तुझ्यासारखे लोक आम्हाला नकोच आहेत…
इतके दिवस तुला आम्ही व्यवस्था म्हणून सांभाळले.
हेच तू तुझे नशीब समज.
राज्यात लाखो कर्मचारी काम करतात.
इतर लोक जसे आपली नोकरी भली की आपण भले असे जगतात अशा स्थितीत आपण कोणीतरी शहाणे आहोत असे समजून थेट जागतिक पुरस्कार मिळवला
आणि त्या धक्क्यातून आम्ही सावरतो ते कमी की काय ?अमेरिकेतील फुल ब्राईट शिष्यवृत्ती मिळाली
…हे जरा अतीच झालं..
ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली. यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. त्यामुळे डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषदेकडे रजा मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यावेळी डिसले यांच्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचे सांगितले गेले आणि शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी गंभीर आरोप देखील केले.
शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी केलेल्या या आरोपांमुळे व्यथित झालेले डिसले गुरुजी सरकारी शिक्षकाची नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत होते, तशी भावना देखील त्यांनी एबीपी माझासमोर बोलून दाखवल होती. इतकच काय तर शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना त्रास दिला, पैशाची मागणी केली असे आरोप देखील केले. तत्कालीन शिक्षणमंत्र्याच्या हस्तक्षेपामुळे डिसले यांची रजा मंजूर झाली. डिसले यांचा फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र आता पुन्हा डिसले यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहेच.
रणजितसिंह डिसले यांनी अद्याप तरी आपल्या राजीनाम्यासंदर्भात माध्यमांसमोर येऊन कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शिक्षण क्षेत्रातील तज्ञ या सगळ्या घटनांमुळे चिंता व्यक्त करत आहेत.
जिल्हा परिषद शाळांमधील घटत्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरुन शिक्षण व्यवस्थेवर नेहमीच प्रश्न उपस्थित होत राहिलेत. मात्र याच शिक्षण व्यवस्थेत राहून जर एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने आपले शाळेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवले. मात्र केवळ तांत्रिक कारणांमुळे अशा शिक्षकाला राजीनामा देण्याची वेळ येते. यावर समाज म्हणून सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे.