भोसरीत आजपासून कीर्तन महोत्सव

434

ह. भ. प. स्व. विठोबा सोनबा लांडे व स्व. इंदुबाई विठोबा लांडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजन

भोसरी । पुणे प्रतिनिधी –

ह. भ. प. स्व. विठोबा सोनबा लांडे व स्व. इंदुबाई विठोबा लांडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त भोसरी (लांडेवाडी) येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालय प्रांगणात १४ ते २१ जुलै दरम्यान ‘माझ्या वडिलांची मिराशी गा देवा….. तुझी चरण सेवा पांडुरंगा |’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० या वेळेत कीर्तन होणार आहेत.

आठवडाभर मान्यवर कीर्तनकारांची हजेरी
या महोत्सवाची सुरवात गुरुवार ( दि. १४) ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाने होणार आहे. शुक्रवारी ( दि. १५) ह. भ. प. सुदाम महाराज पानेगावकर यांचे सायंकाळी साडे सहा ते साडेनऊ या वेळेत कीर्तन होणार आहे. शनिवार (दि.१६) ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत, रविवारी (दि. १७) ह. भ. प. बाळकृष्ण महाराज वसंतगडकर, सोमवार (दि. १८) ह. भ. प. समाधान महाराज शर्मा, मंगळवार ( दि. १९) ह. भ. प. गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक, बुधवार (दि. २०) ह. भ. प. जयवंत महाराज बोदले आणि गुरुवारी (दि. २१) ह. भ. प. केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन होणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक विक्रांत विलास लांडे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले असून वारकरी संप्रदायाची परंपरा समर्थपणे चालू ठेवणे, साधू संतांच्या विचारांचा जागर व्हावा हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. यंदा महोत्सवाचे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षीपासून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. भोसरी परिसरातील नागरिकांनी या कीर्तन महोत्सवाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहनही आ. लांडगे यांच्यावतीने करण्यात आले आहे.