Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीअशी "वाळवी" वारंवार लागो

अशी “वाळवी” वारंवार लागो

योगेश बारस्कर, पुणे 
घरामध्ये लागलेली वाळवी आपण चटकन दूर करतो परंतु मराठी चित्रपटसृष्टी मध्ये सध्या चित्रपटगृहांमध्ये लागलेली परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी ही मराठी चित्रपटसृष्टीला निश्चितच उर्जित अवस्था देणारी आहे. वेगळ्या प्रकारचा प्रयोग, अत्यंत सुंदर मांडणी, बांधिव पटकथा आणि त्याला अभिनेत्यांची असलेली दमदार साथ यामुळे ही वाळवी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते.
वाळवी ही एखाद्या नात्याला लागली तर त्या नात्याचे होणारे परिणाम आणि त्यामुळे माणसाचे दिसणारे राक्षसी रूप दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी अतिशय प्रभावीपणे वाळवी या चित्रपटामध्ये दाखविले आहे. स्वप्निल जोशी, सुबोध भावे यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यांसह अनिता दाते आणि शिवानी सुर्वे यांनी केलेले उल्लेखनीय काम यामुळे चित्रपटाची भट्टी अतिशय चांगल्या प्रकारे जमून आली आहे. चित्रपटांमध्ये एकही गाणे नसताना चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावतो हीच या चित्रपटाची जमेची बाजू आहे. अशा प्रकारचे नवीन प्रयोग मराठी चित्रपट सृष्टी मध्ये वारंवार व्हायला हवे. त्याच त्याच जुनाट पद्धतीचे चित्रपट निर्माण होत असल्यामुळे आधीच मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपटांपासून दूर गेला आहे या प्रेक्षकांना पुन्हा थेटरकडे आणण्यासाठी अशा वेगळ्या प्रयोगांची निश्चितच गरज आहे
चित्रपट हा सस्पेन्स थ्रिलर प्रकारांमधील असल्यामुळे चित्रपटाची गोष्ट फार उलगडून सांगता येणार नाही .तरीही चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला ही गोष्ट स्पर्श नक्कीच करून जाईल अशा प्रकारे या चित्रपटाची आणि पटकथेची मांडणी लेखक आणि दिग्दर्शकांनी केली आहे,
चार प्रमुख पात्रांच्या आयुष्यात एका दिवसात ज्या भन्नाट, गोष्टी होतायत आणि त्याबरोबर इतर दोन तीन माणसं भरडली जातायत ती गोष्ट म्हणजे वाळवी.
मुळातच सस्पेन्स थ्रिलर हा चित्रपट प्रकार मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अतिशय अभावाने हाताळायला जातो त्यातही आतापर्यंत या प्रकारच्या चित्रपटांची मांडणी अतिशय बाळबोध प्रकारे मांडण्यात आलेली दिसून येते त्यावर मुख्यतः हॉलिवूडच्या चित्रपटांचा आणि त्यातही कॉपी करणाऱ्याचे प्रमाण अधिक दिसून येते त्यामुळे चित्रपटातील मूळ गाभा हरवल्यासारखा वाटतो. वाळवी चित्रपटांमध्ये मात्र परेश मोकाशी यांनी पटकथा संवाद यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना बांधून ठेवले आहे. चित्रपटाचे अतिशय तरल असे संकलन प्रेक्षकांना एका मिनिटाची ही उसंत देत नाही. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या घटना प्रेक्षकांना कथेमध्ये अधिकच अडकवून ठेवतात. मध्यंतरानंतर तर कथेचा वेग इतका वाढत जातो की प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते दिग्दर्शकाने चित्रपटाचा केलेला शेवट इतका अनपेक्षित आहे की तो झटका प्रेक्षक थेटर च्या बाहेर गेला तरीही कायम राहतो. त्यामुळेच केवळ सर धोपट चित्रपटांची रांग न लागता मराठी चित्रपट सृष्टी मध्ये दिग्दर्शक, निर्माते आणि लेखकांनी अशा प्रकारच्या चित्रपटांचा आदर्श घेतला तर मराठी चित्रपट सृष्टीला चित्रपट न चालण्याची जी “वाळवी” लागली आहे ती निश्चितच दूर होऊ शकेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!