आवर्जून पहावं असं “शंभराव स्थळ”

320

योगेश बारस्कर , पुणे 

बदलत्या काळाबरोबर अधिकाधिक आत्मकेंद्री आणि व्यावसायिक होत जाणारी तरुण पिढी ही आपल्या करिअरच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला फार महत्त्व देत नाही असे आपल्याला दिसून येते. त्यामुळे करिअर महत्त्वाचे की लग्न महत्त्वाचे हे द्वंद्व कायमच तरुण पिढीमध्ये सुरू असते. हे द्वंद्व अतिशय तरल पणे शंभराव स्थळ या मराठी लघुपटामध्ये मांडण्यात आले आहे. तरुण पिढीची सध्याची मानसिकता त्यांचं आत्मकेंद्री होत जाणं आणि इतर समाजाशी जुळवून घेताना होणारी धडपड अनुभवायची असेल तर हे शंभराव स्थळ नक्कीच पाहायला हवं. हे स्थळ प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल.

आदी निर्मिती प्रोडक्शन तर्फे बंसिधर किनकर दिग्दर्शित आणि गौरव शहा निर्मित शंभराव स्थळ हा लघुपट नुकताच आदी निर्मिती या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित झाला आहे. केवळ दहा दिवसातच तीन लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हा लघुपट पाहिला असून हा लघुपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे .लघुपटाचा विषय, त्याची मांडणी, अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि दीप्ती देवी या अभिनेत्यांचा तरल अभिनय यामुळे हा लघुपट प्रेक्षकांना अधिक आपलासा वाटत आहे.
मुलं मोठी झाली की आई वडिलांना एकच टेन्शन असतं, की एकदा हिचं किंवा त्याचं लग्न झालं की आपण मोकळे.. म्हणूनच वयात आलेल्या मुलांच्या पाठीमागे आई-वडिलांनी लग्नाचा भुंगा सोडलेला असतो… या भुंग्याच्या तावडीतून सुटण्यासाठी बिचारी मुलं धडपडत असतात आणि शेवटी लग्न करण्यासाठी होकार दिला जातो… मग सुरु होतो… स्थळं पाहण्याचा थरारक खेळ…. यातूनच उलगडत जाते अनुजा आणि चिन्मय या दोघांची गोष्ट म्हणजे, ‘शंभरावं स्थळ’….!!
एक महत्वाकांक्षी, यशस्वी, आत्मविश्वासाने परिपूर्ण असणारी अनुजा प्रत्येक स्थळाला नकार देते आहे, याचं नक्की कारण काय ? एक शांत, समंजस मुलगा चिन्मय एका स्थळाला नकार देतो, मग एक मुलगी थेट त्याच्यात घरी जावून नकाराचं कारण विचारते…!! यात अनुजा, चिन्मय आणि यांच्या कुटुंबात रंगलेली गोष्ट म्हणजे ‘शंभरावं स्थळ’ शॉर्टफिल्म्स स्वरुपात मांडण्यात आली आहे.
दिग्दर्शक बन्सीधर किनकर यांनी लघुपटाच्या सुरुवातीपासूनच विषय अतिशय नेमका ठेवला आहे. कुठेही भरकटत न जाणाऱ्या पटकथेमुळे प्रेक्षक या कथेमध्ये गुंतून राहतो. केवळ करिअरलाच महत्त्व देणारी आणि त्या पलीकडे विश्व नसणारी अनुजा दीप्ती देवी यांनी अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. प्रसंगा नुरूप चेहऱ्यामध्ये होणारे बदल दीप्ती यांनी अतिशय मस्तपणे मांडत त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे तसेच चिन्मय उदगीरकर यांनीही आपल्या भूमिकेतून विविध कंगोरे प्रेक्षकांसमोर अतिशय प्रभावीपणे मांडले आहेत. या दोघांची केमिस्ट्री इतकी सुंदर लघुपटामध्ये जुळून आली आहे की ही पात्रे आपल्या आजूबाजूलाच असल्याचा भास कायम प्रेक्षकांना होतो त्यामुळे प्रेक्षक या कथेमध्ये अधिकाधिक गुंतत जातो हेच या कथेचे आणि दिग्दर्शकाचे यश आहे.
कथेतील मुख्य पात्रांना इतर पात्रांची छान साथ लाभल्यामुळे दिग्दर्शकाला अपेक्षित असणारे वातावरण लघुपटामध्ये अतिशय सुंदरपणे निर्माण झाले आहे त्यामुळे प्रेक्षक ही कथा आपलीच असल्यासारखे यामध्ये गुंतून जातो नेमके संवाद पात्रांची योग्य निवड यामुळे दिग्दर्शक आणि निर्माते आपली गोष्ट या लघुपटाच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे आणि यशस्वीपणे मांडतात .त्यामुळेच तरुण पिढीनेच नव्हे तर सर्वांनीच हे शंभरावे स्थळ नक्कीच पाहायला हवं आणि हे स्थळ प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल याची खात्री वाटते.