G 20 अंतर्गत शिक्षण विषयक कार्य गटाच्या (एडडब्ल्यूजी) चौथ्या बैठकीचा पुण्यामध्ये प्रारंभ

201

 

भारताचे G20 अध्यक्षपद म्हणजे जागतिक शांततेसाठी विविधतेचा लाभ घेण्याची संधी- हर्षवर्धन श्रृंगला

शिक्षण विषयक कार्य गटाच्या बैठकीमधील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण मुलभूत साक्षरता सुनिश्चित करण्यासाठी लक्षित प्रयत्नांचा मार्ग प्रशस्त करेल: संजय मूर्ती

G 20 अंतर्गत शिक्षण विषयक कार्य गटाची (एडडब्ल्यूजी) चौथी बैठक आज पुण्यामध्ये सुरु झाली. 22 जून 2023 रोजी शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सादर केल्या जाणार्‍या फलनिष्पत्ती दस्तऐवजाना या बैठकीत अंतीम स्वरूप दिले जाईल.

भारताचे शिक्षण विषयक कार्य गटाचे अध्यक्ष आणि उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती यांनी, शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव संजय कुमार, आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी यांच्या सह या बैठकीचे पाळीपाळीने अध्यक्षपद भूषविले.

चौथ्या शिक्षण विषयक कार्य गटाच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी G20 प्रतिनिधींबरोबर मंत्री स्तरीय घोषणापत्राच्या मसुद्यावर चर्चा झाली. युनिसेफ (UNICEF), OECD आणि युनेस्को (UNESCO) या आंतरराष्ट्रीय संघटनांनी शिक्षण कार्य गटाचा अहवाल सादर केला. एडडब्ल्यूजी अहवाल आणि संकलनाद्वारे संपूर्ण गटासाठी सर्वसमावेशक पद्धतीने एक समान उद्दिष्ट ठरवून, शैक्षणिक धोरणे आणि कार्यक्रम ठरवण्याच्या, भारताचे G20 अध्यक्षपद आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सातत्त्यपूर्ण प्रयत्नांची G20 सदस्य आणि निमंत्रित देशांनी प्रशंसा केली.

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत हा जागतिक आणि स्थानिक आव्हानांसाठी उपायांचा स्त्रोत मानला जात आहे, यावर भारताच्या G20 अध्यक्षपदाचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला यांनी भर दिला. चेन्नई, अमृतसर आणि भुवनेश्वर इथल्या एडडब्ल्यूजीच्या मागील तीन बैठकींमध्ये तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण, संशोधन आणि सहयोग तसेच भविष्यातील काम, यावर भर देत, झालेल्या सर्वोत्तम पद्धतींच्या मौल्यवान देवाणघेवाणीवर प्रकाश टाकण्यात आला. चौथी आणि शेवटची बैठक, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र (FLN) या संकल्पनेवर आधारित असेल. ते म्हणाले की, वैचारिक मतभेद असूनही शाश्वत जागतिक हितासाठी एकत्र काम करणाऱ्या सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर भारताचा भर आहे.

के. संजय मूर्ती यांनी चौथ्या शैक्षणिक कार्यगटाच्या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींचे हार्दिक स्वागत केले. शैक्षणिक कार्यगटाच्या बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांनी केलेली अनुभवांची देवाणघेवाण, सर्वोत्तम पद्धती ही प्रत्येक मुलासाठी मूलभूत साक्षरता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाची लक्ष्यपूर्ती करण्‍यासाठी मार्ग प्रशस्त करेल, असे ते म्हणाले. त्यांनी मागील तीन बैठकांचे महत्त्वही अधोरेखित केले. मागील सर्व शैक्षणिक कार्यगटाच्या कार्यक्रमांमध्ये उत्साही सहभागासाठी त्यांनी जी 20 प्रतिनिधींचे कौतुक केले.

चौथ्या शैक्षणिक कार्यगटाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केलेल्या ‘मूलभूत साक्षरता आणि संख्‍याशास्त्र परिचय’ यामध्‍ये मिश्र शिक्षण पद्धती, या विषयावर एक बैठक आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. याशिवाय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्‍ये 17 ते 22 जून 2023 पर्यंत एक मल्टीमीडिया प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्‍ये 12,000 हून अधिक प्रतिनिधी आणि 80 पेक्षा जास्त प्रदर्शकांनी सहभाग नोंदवला. प्रदर्शनामध्‍ये मूलभूत संख्‍याशास्त्रीय शिक्षणासंबंधी उपक्रम प्रदर्शित करण्यात आले. प्रदर्शनातील एनसीईआरटी, आयकेएस (इंडियन नॉलेज सिस्टम), मायक्रोसॉफ्ट, निपुण भारत उपक्रम, इंडोनेशिया, युनिसेफ, युनेस्को आणि इतर अनेकांचा उल्लेखनीय सहभाग आहे.

जी- 20 प्रतिनिधींनी पुणे शहरामध्‍ये ‘हेरिटेज वॉक’ चा अनुभव घेतला. यावेळी महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्यासाठी शनिवार वाडा, लाल महाल आणि नाना वाडा या स्थळांना प्रतिनिधींनी भेटी दिल्या. याचबरोबर या प्रतिनिधीसाठी, प्रफुल्ल मन आणि आत्मा, यासाठी, आंतरराष्ट्रीय योग दिनी योगासने आयोजित करण्यात आली आहेत.