चित्रकार अदिती मालपाणींच्या कलाकृतीने घातली सर्वांना मोहिनी
अनिल चौधरी , पुणे,
“शहरात कलाकारांची कमतरता नाही. कलाकारांच्या माध्यमातूनच राज्याची संस्कृती देशभर आणि जगभर पोहोचण्यास मदत होत आहे. अशाच प्रतिभाशाली कलाकारांच्या मालिकेतील युवा चित्रकार अदितीने शक्ती, चैतन्य आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी या त्रिमूर्तीचे अप्रतिम चित्र साकारून सर्वांची मने जिंकली आहेत.
रामजन्मभूमी तीर्थस्थळ निर्माण समितीचे कोषाध्यक्ष व गीता परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्ष
पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ७५ व्या जन्मोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र आळंदी येथे गीता परिवार आयोजित भव्य गीता भक्ती अमृत महोत्सवात आदिती मालपाणी यांनी चितारलेले ‘विमर्श’ हे चित्र स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांना भेट म्हणून देण्यात आले. त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी वरील उद्गार काढले.
ते पुढे म्हणाले की, अदितीने चित्रकला पुरेपूर आत्मसात केली आहे. या चित्राचे बाह्य कवच माझ्या स्वतःच्या पूज्य गुरूंच्या ‘ओम नमः शिवाय’ च्या आवाजाने उघडते. यावेळी देवीचे सौंदर्य पाहून मन प्रसन्न होते.
ते पुढे म्हणाले की “ असे मानले जाते की विश्वाची निर्मिती ध्वनीद्वारे झाली आहे, म्हणून मी त्रिमूर्तीची शक्ती पाहण्यासाठी माझ्या गुरूंच्या मुखातून निघणारा दिव्य आवाज निवडला आहे.
ओंकार प्रणवोच्चार ध्वनीने बाह्य चित्र उघडले जाते हे त्याचे वैशिष्ट्य आहे. “
“ तसेच या कलाकृतीमध्ये तबला, वीणा, सतार या भारतीय वाद्यांचा मधुर आवाज ऐकू येतो आणि आतून दिव्य प्रकाश पसरतो. माँ सरस्वती, माँ लक्ष्मी आणि माँ दुर्गा यांच्या ऊर्जेचा स्पर्श झाल्यासारखे वाटते.”
बाबा रामदेव म्हणाले, “हे देवीचे अप्रतिम चित्र आहे, ते पाहून मन प्रसन्न होते आणि ध्यानावस्थेत पोहोचते. “ व्यासपीठावर उपस्थित बहुतांश सर्वच थोर संतांनी सांगितले की,त्यांनी अशा स्वरूपाची अद्भुत कलाकृती प्रथमच पाहिली आहे.
अडमा आर्टच्या अदितीने चित्रकलेतून संदेश दिला आहे की, सर्जनशील कला ही सर्वोच्च शक्तीशी जोडली गेली तरच उत्कृष्ट कलाकृती जन्म घेते. जेव्हा माणूस सर्व काही विसरतो आणि त्या शक्तीच्या चरणी लीन होतो तेव्हाच आंतरिक चैतन्य सृजनशील कार्य करते.
6 बाय 6 फूट आकाराच्या या पेंटिंगमध्ये पृथ्वी, पाणी, अग्नि, वायू आणि शून्य या पाच घटकांचा समावेश आहे. या कलाकृतीचे वैशिष्टय़ म्हणजे ते यांत्रिकी, संगीत, उत्पादन डिझाइन या सर्व गोष्टींपासून कलेची जोड देऊन तयार केले आहे.
या चित्राच्या निर्मितीचा प्रवास उलगडून दाखविताना अदिती ने सांगितले की “हे चित्र स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या श्रीयंत्राच्या संकल्पनेवर आधारित आहे. स्वामीजींच्या पावन सान्निध्यात व छत्रछायेखाली श्रीयंत्राचा अभ्यास करत असताना तिला एका दैवी शक्तीशी आंतरिक परस्पर संबंध जाणवू लागला त्यातून या चित्राची कल्पना सुचली .असे वाटले की जणू काही शक्तीच माझ्याद्वारे हे काम घडवत आहे. माझी कल्पनाशक्ती साकारण्यात परमेश्वरी आशीर्वाद, पाठबळ यांचे स्पष्ट संकेत मला जाणवले. जणू काही मंदिरातील देवीचे दर्शन घडत आहे आणि तिची ऊर्जा चहूबाजूंनी माझ्यावर वर्षाव करीत आहे याची अनुभूती मला आली. “
महाराष्ट्रातील प्रसिद्ध मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ.संजय आणि अनुराधा मालपाणी यांची कन्या अदिती हिला लहानपणापासूनच कलेचे आकर्षण होते. तिने स्पेनमधील बार्सिलोना येथे इंडस्ट्रियल डिझायनिंगचे उच्चस्तरीय शिक्षण घेतले आहे.