रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी वीस जणांविरोधात गुन्हा दाखल…

166

“राजकीय षडयंत्र अन हडपसर पोलिसांची कारवाई, मराठा समाजात नाराजी….

पुणे प्रतिनिधी,

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात हडपसर मांजरी फाटा चौकात रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी सुमारे 20 जणांविरोधात हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनाच्या दिवशी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली असताना पोलिसांकडून दोन दिवसानंतर गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संदीप लहाने पाटील, महेश टेळे पाटील, बाळासाहेब भिसे, अनिल बोटे, कुणाल मोरे, विजय भाडळे, रमेश तुपे यांच्यासह 10 ते 15 अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते, जरांगे पाटील व समन्वयक समितीच्या आदेशानुसार महाराष्ट्रात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते यामध्ये पुण्यात हडपसर मांजरी फाटा चौकात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रतिकात्मक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, आंदोलकांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर नोटीस देऊन, प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडण्यात आले.
रास्ता रोको आंदोलन केले म्हणून आमच्या विरोधात हडपसर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय षडयंत्र करून वरिष्ठांच्या आदेशानुसारच कारवाई झाल्याचा आरोप सकल मराठा समाजाचे समन्वयक संदीप लहाने पाटील यांनी केला आहे.
मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक संदीप लहाने पाटील महेश टेळे पाटील, बाळासाहेब भिसे, अनिल बोटे, कुणाल मोरे, विजय भाडळे, रमेश तुपे व त्यांच्यासोबत दहा ते पंधरा इसम यांनी मांजरी फाटा चौकात जमून घोषणा दिल्या पोलीस उपायुक्त विशेष शाखा पुणे शहर यांच्या जमावबंदीच्या आदेशाचा भंग केला म्हणून भादवि कलम 143 सह महाराष्ट्र पोलीस कलम 135 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अशी माहिती हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.

समाजाच्या न्याय्य मागण्यासाठी गुन्हे झाले तरी बेहत्तर……
हडपसर मध्ये पोलिसांना पत्र देऊन शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन केले होते, त्यावेळी आमच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई होऊन सुद्धा पोलिसांनी गुन्हे दाखल केले, आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून समाजाच्या न्याय्य मागण्यासाठी किती गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही असे संदीप लहाने पाटील, महेश टेळे पाटील व बाळासाहेब भिसे यांनी सांगितले.