नागरिक त्रस्त प्रशासन मस्त…
गणेश जाधव, कोंढवा
कोंढव्यातील शिवनेरी नगर, गल्ली क्रमांक 29 या भागात अनाधिकृत बांधकाम राजरोसपणे सुरू आहेत.अशा अनधिकृत बांधकामामुळे स्थानिक रहिवाशांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता सहा ते सात मजली अनाधिकृत बांधकाम कोणाच्या आशीर्वादाने निर्माण केले जात आहेत ? याबाबत स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अशा अनाधिकृत बांधकामाच्या मोकळ्या जागेवर व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांचा वावर नियमितपणे असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झाली.नवतरुण युवक व्यसनाच्या आहारी जात असून या ठिकाणी गांजा ओढण्याकरिता, दारू पिण्याकरिता एकत्रित येतात आणि त्यानंतर वादविवादाचे मुद्दे उपस्थित झाल्यावर त्याचे रूपांतर मोठ्या भांडणात होत असल्याबाबतचे काहीसे चित्र गल्ली क्रमांक 29 मधील अनाधिकृत बांधकामांमध्ये असलेल्या मोकळे जागेवर दिसले.
या तरुणांमध्ये काल संध्याकाळी कोणत्यातरी कारणावरून वादविवाद झाला आणि त्या वादविवादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. नंतर हा वाद दोन गटांमध्ये जाऊन पोहोचला त्यामुळे स्थानिक रहिवासी अतिशय घाबरलेल्या मनस्थितीत आपल्या वेदना प्रसारमाध्यमांसमोर मांडताना दिसले.एका तरुणाला इतर पाच ते सहा तरुण बेदमपणे मारत असतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे..
व्यसनी तरुण या ठिकाणी नऊ ते दहा तरुणांचा टोळका एकत्रितपणे दररोज अशा ठिकाणी बसून मद्यप्राशन करतात त्यामुळे परिसरातील महिला ,आबालवृद्ध, लहान मुले यांना त्रास होत असल्याचे धिम्या आवाजात बोलले जात आहे.
स्थानिक रहिवाशांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाला अनेक तक्रारी दिले असता कोणतीही कारवाई केली जात नाही तसेच अशा अनधिकृत बांधकामांना राजकीय पक्षांचा कृपाशीर्वाद असल्याचे देखील स्थानिकांकडून सांगण्यात आले..
स्थानिक रहिवासी आता तरी अशा घोळक्यांवर कारवाई करावी अशी मागणी पोलीस प्रशासन तसेच महानगरपालिका अधिकारी यांच्याकडे करीत आहेत…



