मराठीत पाट्या न लावल्यास मनसे खळ खट्याक

966

गणेश शिंदे प्रतिनिधी, कामोठे /पनवेल

महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम १९४८,२१ जून १९६९, १ मार्च १९८९ तसेच ७ सप्टेंबर १९८१ अन्वये महाराष्ट्र राज्यातील दुकाने, संस्था व आस्थापना, शाळा, महाविद्यालये तसेच सरकारी व खाजगी आस्थापनावरील नामफलक मराठीत (देवनागरी लिपीत) करणे बंधनकारक आहे. तसेच हे नामफलक बनवताना मराठीतील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नयेत असेही कायद्यात नमूद आहे. परंतु सदर काही आस्थापने मराठीत नामफलक करण्याबाबत पद्धतशीरपणे टाळाटाळ करत आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या भाषेचा नामफलक न लावता, मराठीत व्यवहार न करता तुम्ही महाराष्ट्राचा व मराठी जनतेचा अपमान करत आहात. तसेच महाराष्ट्र राज्यभाषेला तुच्छ मानण्याचा गंभीर गुन्हा आपण करत आहात. खरे पाहता महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सेवाशर्तीचे नियमावली प्रमाणे मराठी भाषेत फलक असणे बंधनकारक आहे असे असताना प्रमाणपत्र( गुमास्ता लायसन्स ), फूड लायसन्स मिळतेच कसे असा प्रश्न देखील येथे उपस्थित होतो.            महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चार फेब्रुवारी रोजी कामोठे शहरातील दुकानदारांना नामफलक मराठीत करण्यासाठी हे पत्र दिल्यापासून १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हा इशारा जे गंभीरपणे घेणार नाहीत त्यांना महाराष्ट्र साधन संपत्तीत भागीदार करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असा इशारा त्यांना देण्यात आला. त्याप्रसंगी मनसे कामोठे शहराध्यक्ष रोहित दुधवडकर, उपशहराध्यक्ष मनोज कोठारी, मिलिंद खाडे, विशाल चौधरी, जयकुमार डिगोळे, अमित ठुबे, आशुतोष सोनावणे, नितीन सातपुते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.