महाराष्ट्र दिनी पालकमंत्री बापट यांच्‍या हस्‍ते मुख्‍य शासकीय ध्‍वजारोहण

657

मल्हार न्यूज प्रतिनिधी, पुणे 

महाराष्ट्र राज्‍य स्‍थापनेच्‍या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त अन्‍न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्‍न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्‍या हस्ते ध्‍वजारोहण झाले.

शिवाजीनगर येथील पोलीस संचलन मैदानावर झालेल्‍या कार्यक्रमास विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, पुणे शहराचे पोलीस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाथन यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी पोलीस बँडवर राष्‍ट्रगीत वाजवण्‍यात आले. त्‍यानंतर मानवंदना देण्‍यात आली. पालकमंत्री बापट यांनी पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल आदींच्‍या संयुक्‍त संचलनाची पहाणी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांना देखील पालकमंत्री बापट यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

कार्यक्रमास खा. अमर साबळे, महापौर मुक्‍ता टिळक, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष विश्‍वासराव देवकाते यांच्‍यासह आनंद लिमये, एस. चोकलिंगम, शेखर गायकवाड, विक्रमकुमार, सुभाष डुंबरे, प्रताप जाधव, संजयसिंह चव्हाण, रमेश काळे, चिंतामणी जोशी, जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, प्रमोद केंभावी, भाऊसाहेब गलांडे, अमृत नाटेकर, सुधीर जोशी, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, भानुदास गायकवाड या शासकीय अधिका-यांसह स्‍वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, ज्‍येष्‍ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, छायाचित्रकार, विद्यार्थी, महिला, पोलीस अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची भेट घेऊन महाराष्‍ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्‍त पालकमंत्री बापट यांनी शुभेच्छा दिल्‍या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम नरके आणि प्रिया बेल्‍हेकर यांनी केले.