वाढदिवस साजरा करून देवदर्शनासाठी निघालेल्या तीन जणांचा अपघातात मृत्यू

643

धनकवडी वार्ताहर, पुणे

वाढदिवस साजरा करुन खेड शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना ट्रकने दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यु झाला. तर ५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील किर्लोस्कर कंपनीसमोर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास झाला. हे सर्व तरुण तळजाई येथील राहणारे होते. सुशील गोपाळ कांबळे (वय २३, रा. तळजाई पठार), सुरज शिंदे (वय २४) आणि अनिकेत भारत रणदिवे (वय २३) अशी अपघातात मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. अपघातामधील मृत्यू झालेल्या तरुणांचे शिवविछेदनासाठी भोर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर या अपघातामध्ये जखमी झालेल्या करण जाधव , राकेश कुर्हाडे , अमर कांबळे , चेतन लोखंडे या तरुणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तळजाई , पद्मावती वर पसरली शोककळा.

सुशील कांबळे याचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे सोमवारी रात्री अकरा वाजता सुशिल याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व मित्र तळजाई टेकडीवर एकत्र आले. त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर सुशिल ने आपल्या आईला संपर्क साधून खेड शिवापूर ला जात असल्याचे सांगितले. तीन दूचाकींवर आठ मित्र खेड शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी निघाले कात्रज घाट ओलांडून जात असताना शिंदेवाडी येथे आल्यावर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये तिघांचा दुर्दैवी अंत झाला. आणि तळजाई पठार व पद्मावती वर शोककळा पसरली.