प्रतिभा चौधरी,पुणे
भारताच्या जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 या उपग्रह प्रक्षेपक यानाद्वारे चांद्रयान-2 यशस्वीरित्या झेपावले. 3840 किलो वजनाचे हे चांद्रयान पृथ्वीभोवती सध्या फिरत आहे.
20 तासांच्या उलट गणतीनंतर जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 या प्रक्षेपकाने श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज दुपारी 2 वाजून 43 मिनीटे या नियोजित वेळेला चांद्रयानासह झेप घेतली.
उड्डाणानंतर 16 मिनीटं आणि 14 सेकंदानंतर प्रक्षेपकाने चांद्रयान-2 पृथ्वीच्या कक्षेत सोडले. प्रक्षेपक वाहनापासून चांद्रयान विलग झाल्यानंतर चांद्रयानाचा सोलार ॲरे आपोआप कार्यरत होऊन इस्रोच्या ISTRAC ने त्यावर नियंत्रण घेतले.
इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. के.सिवान यांनी या आव्हानात्मक मोहिमेतल्या प्रक्षेपक यान आणि उपग्रह चमुचे अभिनंदन केले आहे. भारतातल्या अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले.
जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 ने चांद्रयान-2 नियोजित कक्षेत यशस्वीरित्या सोडल्याचे जाहीर करताना आपल्याला आनंद होत असल्याचे सिवान म्हणाले.
चांद्र मोहिमेच्या ऐतिहासिक प्रवासाची आज सुरुवात होत असून आत्तापर्यंत कोणीही शोध न घेतलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वैज्ञानिक परीक्षण या चांद्रयानाद्वारे करण्यात येणार आहे. 15 जुलै 2019 ला इस्रोने चांद्रयान-2 च्या उड्डाणाआधी काही मिनीटं तांत्रिक समस्या आल्याचे ओळखले त्यानंतर त्यावर काम करुन त्यात 24 तासात दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतरच्या दीड दिवसात त्या संदर्भात आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या आणि करण्यात आलेली दुरुस्ती योग्य दिशेने झाल्याची खातरजमाही करण्यात आली. यानंतर इस्रोने आजचे यश संपादन केले असे डॉ. सिवान म्हणाले.
येत्या काही दिवसात चांद्रयानाची कक्षा वाढवण्यात येईल आणि चंद्राच्या जवळ जाण्याच्या दृष्टीने यानाचा प्रवास सुरु होईल.
जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 इस्रोने विकसित केले आहे. चांद्रयान-2 हे भारताचे चंद्रावरचे दुसरे अभियान आहे. यामध्ये स्वदेशी बनावटीचा ऑरबिटर, लॅन्डर (विक्रम) आणि रोव्हर (प्रग्यान) यांचा समावेश आहे.
चंद्रावरची भौगोलिक रचना, खनिज विज्ञान, पृष्ठभागावरची रासायनिक रचना आणि वातावरण यांचा तपशीलवार अभ्यास करुन चंद्राबाबतच्या ज्ञानात अधिक वृद्धी करणे हा या चांद्र मोहिमेचा उद्देश आहे. पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेल्यानंतर आणि चंद्राच्या कक्षेजवळ गेल्यानंतर लॅन्डर ऑरबिटरपासून विलग होणार आहे. त्यानंतर एक चांद्रदिवस म्हणजे पृथ्वीवरचे 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर परिक्षण आणि प्रयोग करणार आहे. ऑरबिटर एक वर्ष आपले काम चालू ठेवणार आहे.
लॅन्डरचे वजन 1477 किलो तर रोव्हरचे वजन 26 किलो आहे. रोव्हर 500 मीटरपर्यंत प्रवास करु शकतो. त्यासाठी सौर पॅनलने निर्माण केलेल्या इलेक्ट्रिक ऊर्जेवर त्याचे काम चालणार आहे.
चांद्रयान-2 चे यशस्वी उड्डाण म्हणजे या आव्हानात्मक मोहिमेतला महत्वाचा टप्पा आहे. श्रीहरीकोटा इथल्या प्रेक्षागृहात 7500 प्रेक्षकांनी चांद्रयान-2 चे थेट उड्डाण अनुभवले.