कोंढवा पोलिसांच्या वतीने गणेश मंडळांच्या बैठकीचे आयोजन

594

कोंढवा प्रतिनिधी, 

गणेशोत्सवात गणेश मंडळांनी नियम व अटींचे पालन करून शांततेत गणेशोस्तव पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गणेश मंडळांचे व नागरिकांचे पोलीस कशा प्रकारे सहकार्य घेऊ शकतील उत्सवाच्या काळात काय करावे आणि काय टाळावे तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या समस्या आणि सूचना जाणून घेण्यासाठी पोलिसांतर्फे मंगळवारी दिनांक 27 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी 5:00 वा. सुमारास परिमंडळ 5 मधील गणेश मंडळातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेला गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश उत्सव संयमाने साजरा केला जाईल, अशी भावना परिमंडळ 5 मधील गणेश मंडळांनी व्यक्त केली आहे. तसेच पूरग्रस्तांना आर्थिक मदत, गाव दत्तक यांसारखे उपक्रमही काही गणेश मंडळ राबवत आहेत. राज्यावर दुःखाचे सावट असले तरी परंपरा जपण्याच्या हेतूने गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. मात्र, तो साजरा करताना परिस्थितीचे भान ठेवले जाईल, अशी भूमिका परिमंडळ 5 मधील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी कोंढवा पोलिसांनी आयोजित केलेल्या बैठकीत स्पष्ट केले. या बैठकीत अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर सुहास बावचे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करत मनोगत व्यक्त केले.

गणेश मंडळांनी सुरक्षिततेच्या अनुषंगाने गणपती उत्सवाच्या ठिकाणी दररोज सुरक्षितेसाठी कार्यकर्ते नेमावे गणेश मंडळाने जे कोणी कार्यकर्ते नेमणार आहेत त्यांची माहिती संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी. जेणेकरून संबंधित पोलिस कार्यकर्त्यांची पडताळणी करून त्याठिकाणाच्या सुरक्षिततेची 100% जबाबदारी घेऊ शकतील. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्या वेळोवेळी गणपती मंडळांना भेटी राहतील. पोलिसांच्या भेटी दरम्यान गणेश मंडळाची सुरक्षिततेच्या अनुषंगाने पाहणी केली जाईल. गणेश उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये या करता मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे. एखादी संशयास्पद किंवा बेवारस वस्तू आढळून आल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा व त्याच प्रमाणे जवळपास संशयित व्यक्ती जरी आढळून आली तरी त्याची माहिती पोलीस स्टेशनला कळवावी. विसर्जनाच्या दरम्यान वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता गणेश मंडळांनी घ्यावी. पोलिस व वाहतूक विभागाकडून कोंडी करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात येईल. विसर्जनाच्यावेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना आग्रहाचे निवेदन आहे की गणेश मंडळ जास्त वेळ रेंगाळत न ठेवता पुढे सरकत ठेवावे. जेणेकरून इतर लोकांना मिरवणुकीच्या अनुषंगाने त्रास होणार नाही. याची खबरदारी गणपती मंडळांनी घ्यावी, असे आव्हान कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी केले.

गणेशोत्सव काळात कार्यकर्त्यांनी एकमेकांशी वाद घालने टाळावे हीच अपेक्षा गणेश मंडळा कडून राहील. रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी रस्त्यावर मंडप उभे करू नयेत. गणेश मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास चांगले जेणेकरून विपरीत घटना घडलीतर त्याचा मागोवा घेता येईल. गणेश मंडपाच्या मागील बाजूस जुगार खेळताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. गणेश मंडळ ज्या ठिकाणी गणेशाची स्थापना करणार आहे त्या खाजगी जागेच्या मालकांचे संमतीपत्र व इतर ठिकाणी असल्यास नगरपंचायतीची परवानगी घ्यावी, अशा सूचना बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  मुरलीधर करपे यांनी केल्या.

सदर कार्यक्रमात, अप्पर पोलीस आयुक्त पूर्वप्रादेशिक विभाग पुणे शहर सुनील फुलारे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त वानवडी विभाग सुनील कलगुटकर, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग रासम, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे, मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भोसले, परिमंडळ 5 मधील गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी, विघ्नहर्ता न्यासचे सर्व परीक्षक, नगरसेवक, शांतता कमिटी सदस्य, पोलीस मित्र, महिला दक्षता समिती, विधी संस्थेचे पदाधिकारी, ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक व गणेश मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.