चित्रांमधून घेतलीय रोजच्या जीवनातील घटनांची दखल

947

अमूर्त शैलीतील चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानेश्वर टकले, पुणे,
रोजच्या जीवनात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची नोंद आणि मनामध्ये उमटणाऱ्या तरंगांचे प्रतिबिंब दाखविणाऱ्या अमूर्त चित्रशैली प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनातील चित्रे पाहून कलारसिक हरखून जात असून, नक्कीच दखल घेण्याजोगी चित्रे नवोदित चित्रकाराने साकारली आहेत.
घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवनमधील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत आर्ट बीटस् फाऊंडेशन आयोजित अमूर्त शैलीतील चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय चित्रकार सागर तळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे शिल्पकार प्रशांत गायकवाड, ज्येष्ठ चित्रकार मिलिंद फडके यांच्यासह आर्ट बीटस् फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष पांचाळ, चित्रकार शिवम हुझुरबाजार आदी उपस्थित होते.
शिवम् हुझुरबाझार या जळगाव येथील नवोदित चित्रकाराने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब चित्रांच्या माध्यमातून साकारले आहे. प्रदर्शनातील सर्व चित्रे ही अमूर्त चित्रशैलीतील असून, रोजच्या जीवनात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची नोंद चित्रकाराने घेतली आहे. हे प्रदर्शन ३१ ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत पुणेकर रसिकांसाठी विनामूल्य सुरू राहणार आहे. कलारसिकानी या प्रदर्शनास आवर्जून भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.