भूषण गरुड
हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून दोन वेळा या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. याशिवाय युतीच्या खासदाराकीच्या उमेदवारांना या मतदारसंघात मोठी आघाडी मिळत राहिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्याबरोबरच शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्याला त्यांची जागा दाखवणार, असा इशारा हडपसरमधील शिवसेनेचे नेते व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार व पदाधिकारी यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, उपशहरप्रमुख समीर तुपे, सहसंपर्कप्रमुख विजय देशमुख, विधानसभा अध्यक्ष तानाजी लोणकर, राजेंद्र बाबर, जान मोहमंद शेख, नगरसेविका प्राची आल्हाट, शंकर घुले, मारुती ननावरे, आशिष आल्हाट, महेंद्र बनकर यावेळी उपस्थित होते.
युतीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून माजी आमदार महादेव बाबर व नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार चुरस असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना करीत आहे.
प्रमोदनाना भानगिरे म्हणाले, हडपसर विधानसभा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असून मागच्या निवडणुकीत युती तुटल्याने स्वतंत्र लढवून भाजपचा उमेदवार निवडून आला. हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रही मागणी आम्ही सर्व इच्छुक उमेदवार व पदाधिकारी करणार आहोत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेना खेचून आणणारा व भगवा फडकविणार ,असा विश्वास माजी आमदार महादेव बाबर यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या माध्यमातून राज्यभर जन आशीर्वाद यात्रा सुरू असून ही यात्रा हडपसर परिसरात येणार आहे. त्यामुळे हडपसर मतदारसंघाच्या वतीने जोरदार तयारी करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष तानाजी लोणकर यांनी सांगितले. हडपसर मतदारसंघातील शिवसेना संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना घरी बसविणार, असा इशारा उपशहरप्रमुख समीर तुपे यांनी दिला आहे.
पक्षप्रमुखांच्या निर्णयाची वाट पाहतोय
लोकसभा निवडणूक झाल्यापासून मतदारसंघात शिवसेना पदाधिकारी वेगवेगळ्या गटाने शक्तिप्रदर्शन करत आहेत. शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमातून अनेकदा अंतर्गत गटतट उघडपणे दिसून आले आहेत, मात्र आजची पत्रकार परिषद त्याला अपवाद राहिली सर्वच इच्छुक एकत्र आले आणि एकमेकांना सन्मान देत त्यांचे म्हणणे हेच माझेही म्हणणे आहे, असा सूर आळवत आमच्यात कसलेही गटतट नसल्याचे सांगत “हम साथ साथ है’ चा नारा देत आता फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट पहायची आणि हडपसरमध्ये शिवसेनेचाच आमदार होणार अशाप्रकारचा विश्वास उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी व्यक्त केला.