प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या वतीने आयोजित ‘जल की बातें’ उपक्रमाला सुरुवात

617

प्रतिभा चौधरी, पुणे

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या वतीने  पाण्याचे महत्व सांगणाऱ्या ‘जल की बातें’ या उपक्रमाला आजपासूनसुरुवात झाली.  पुण्यातील सहकारनगर येथील पंडित भीमसेन जोशी कलादालन या उपक्रमाचे उद्घाटन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक भूपेंद्र  कॅन्थोला यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोचे संचालक संतोष अजमेरा, सहाय्यक संचालक भरत  देवमणी आणि सेव्ह वॉटर हिरो अवॉर्ड विजेते मकरंद टिल्लू उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मकरंद मसराम आणि ममता मसराम यांच्या गणेश वंदनेने झाली तसेच ब्युरोच्या कलाकारांनी पाणी या विषयावर गीतेही सादर केली.

 भारत सरकारने सुरू केलेल्या हा उपक्रमाचे  स्वच्छ भारत अभियानासारख्या मोठ्या लोक चळवळीत रूपांतर झालं पाहिजे. तसेच या मोहिमेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असे आवाहन भूपेंद्र कॅन्थोला यांनी यावेळी बोलताना केले.

ब्युरोचे संचालक संतोष अजमेरा म्हणाले की, ‘जल की बातें’ ही भारत सरकारने सुरू केलेली लोक चळवळ आहे. ‘जनशक्ती से जलशक्ति’ ही या मोहिमेची संकल्पना आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात ‘जल की बातें’हा पाणी वाचवा  हा संदेश देणारा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात येतो आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी जलतरण चित्र रंगवा स्पर्धा, जल प्रबोधन वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन स्पर्धा आणि जलरंग रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आज दिवसभरात सुमारे 3000 जणांनी या उपक्रमाला भेट दिली. यात ‘जलदर्शन’ ह्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हे पाहण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी यावे असे आवाहन ब्युरोचे संचालक संतोष अजमेरा यांनी केले आहे. हे प्रदर्शन बुधवार 11 सप्टेंबर पर्यंत सकाळी 9 ते6 पर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.