पुणे प्रतिनिधी,
‘गाढवाचे लग्न’ या तुफान गाजलेल्या विनोदी चित्रपटातील गंगी म्हणजे ‘डाॅ.राजश्री लांडगे’ यांनी गावखेड्यातीलच नव्हे तर शहरी प्रेक्षकांना देखील आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. सिटीझन या सिनेमाद्वारे निर्माता म्हणून पदार्पण करत सिनेमाची कथा आणि वेशभूषा सुध्दा पाहीली. अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपणार्या राजश्री यांना आजवर अनेक नामांकित पुरस्कारांनी नावाजले गेले आहे.
त्यांच्या या कारकिर्दीची दखल घेत भारत गौरव फौंडेशन ने डॉ. राजश्री लांडगे यांना ‘द् अनसीन हिरोज्’ या उपक्रमा अंतर्गत कला आणि सांस्कृतिक विभागात दिल्ली येथील ताज पॅलेस हॉटेलमध्ये केंद्रीय पोलाद मंत्री श्री. फग्ग्न सिंग कुलसते यांच्या हस्ते ‘भारत गौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.
बिजू जनता दलाचे माजी खासदार प्रसन्न कुमार पाटसनी, भारत गौरव फौंडेशनचे कार्याध्यक्ष संदेश यादव याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. राजश्री लांडगे यांना आपला अनुभव विचारला असता, ‘भारत गौरव पुरस्कारा’ने माझ्या पाठीवर दिलेली ही कौतुकाची थाप असून माझा आनंद सर्वांसोबत मांडताना मला खरंतर शब्दच अपुरे पडत आहेत. हे पुरस्कार कलाकारांमध्ये एक सकारात्मक उर्मी निर्माण करतात आणि म्हणूनच हा पुरस्कार मला देखील आणखी चांगले काम करत राहण्याची ऊर्मी देईल.”
या समारंभात केंद्रीय जलशक्ती मंत्री ‘श्री. रतनलाल कटारिया’, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय माऊंट येथील कार्यकारी सचिव ‘राजयोगी ब्रह्माकुमार मृत्युंजय’, माजी केंद्रीय मंत्री ‘डॉ. सत्यनारायण जाटिया’ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ‘डॉ. राजश्री लांडगे’ यांच्यासह १४५ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय ‘डॉ. दीपक हारके’, युवा खासदार ‘मार्गानी भारत राम’, अर्जुन अवॉर्ड विजेता कुस्तीपटू ‘गुंगा पहिलवान’, सुप्रसिध्द उद्योजिका ‘पद्मश्री कल्पना सरोज’, ओरिजिनल पॅड मन ‘अरुनाचलम मुरुगनंथन’, चित्रपट दिग्दर्शक ‘मेहुल कुमार’, बिहारचे प्रिन्सिपॉल सेक्रेटरी ‘सुल्तानपेट राजू’, उत्तर प्रदेश चे पोलीस महासंचालक ‘महेंदर मोदी’, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष जस्टिस ‘नरेंद्र कुमार जैन’, स्किल डेव्हलोपमेंटचे डायरेक्टर जनरेल ‘डॉ. रूपक वसिष्ठ’, कुस्तीपटू ‘संग्राम सिंग’, फॅशन डीझाइनर ‘निवेदिता साबू’, यांनाही ‘भारत गौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.