पुणे प्रतिनिधी,
21 ऑक्टोबरला होणाऱ्या मतदान प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असून विधानसभा निवडणुकी कामी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणुकीत नेमून दिलेली कामे बिनचूकपणे पार पाडण्यासाठी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राम यांनी विधानसभा क्षेत्रातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.
विधानसभा निवडणूक चुकाविरहित व अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,असे सांगत जिल्हाधिकारी राम म्हणाले,क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदानाच्या दिवशी त्यांना कोणते काम पार पडायचे आहे याचे व्यवस्थित वाचन करावे. त्यांना दिलेल्या पुस्तिकेत याबद्दलची सर्व माहिती दिली आहे. मतदान प्रक्रिया सुलभ आणि शांततेत पार पाडण्यासाठी आपले कर्तव्य आणि जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी, असे आवाहन करून निवडणुकी संदर्भातील माहिती सर्वांनी व्यवस्थितपणे समजून घ्यावी. निवडणूकी दरम्यान सर्व केंद्रस्तर अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी,कर्मचाऱ्यांकडे असणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
सर्व मतदान केंद्रांवर पाणी, वीज,स्वच्छतागृह आदी पायाभूत सुविधा आहेत का याबाबत खात्री करावी,पाऊस झाला तर काय काळजी घ्यावी याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. त्याचबरोबर दिव्यांग मतदारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत याचीही खात्री करुन घेण्यास सांगितले.याचबरोबर मतदारांसाठी असणारे मदत केंद्र, कसबा मतदारसंघात प्रथमच होत असलेला बुथ ॲपचा वापर,महिलांसाठीचे सखी मतदान केंद्र आदींबाबतही त्यांनी माहिती दिली. यावेळी निवडणूक कामी नियुक्त सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
00000