पुणे प्रतिनिधी,
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! आज दीपावलीचं पवित्र पर्व आहे! आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याकडे असं म्हटलं गेलं आहे,
शुभम् करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदाम!
शत्रुबुद्धीविनाशाय दीपज्योतीर्नमोस्तुते!
किती उत्तम संदेश आहे. या श्लोकात असं म्हटले आहे-प्रकाश जीवनात सुख, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येतो, जो वाईट बुद्धीचा नाश करून, सद्बुद्धी दाखवतो. अशा दिव्यज्योतीला माझं नमन आहे. ही दीपावली स्मरणात ठेवण्यासाठी यापेक्षा जास्त चांगला विचार काय असू शकेल की, आपण प्रकाश सर्वत्र फैलावू, सकारात्मकतेचा प्रसार करू आणि शत्रुत्वाची भावना नष्ट करण्यासाठी प्रार्थना करू या. आजकाल जगातल्या अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते. विशेष गोष्ट ही आहे की, यात केवळ भारतीय समुदाय सहभागी होतात असं नव्हे तर आता अनेक देशांची सरकारे, तिथले नागरिक, तिथल्या सामाजिक संघटना दिवाळी सण पूर्ण आनंद उत्साहात साजरे करतात. एक प्रकारे तिथं `भारत’ साकार करतात.
मित्रानो, जगात उत्सवी पर्यटनाचं स्वतःचं आकर्षण असतं. आमचा भारत, जो सणांचा देश आहे, त्यात उत्सवी पर्यटनाच्या अफाट शक्यता आहेत. होळी असो, दिवाळी असो, ओणम असो, पोंगल असो, बिहू असो, अशा प्रकारच्या सणांचा प्रसार करून सणांच्या आनंदात इतर राज्यं, इतर देशांच्या लोकांनाही सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न असला पाहिजे. आमच्याकडे तर प्रत्येक राज्य, प्रत्येक क्षेत्रात आपापले इतके वेगवेगळे उत्सव होतात – दुसऱ्या देशातल्या लोकांना यात खूप रस असतो. म्हणून, भारतात उत्सवी पर्यटन वाढवण्यात, देशाबाहेर राहणाऱ्या भारतीयांची भूमिका अतिशय महत्वाची आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या `मन की बात’मध्ये या दिवाळीत काही तरी वेगळं करायचं, असं ठरवलं होतं. मी अस म्हटलं होतं – या, आपण सर्व जण या दिवाळीला भारताची नारी शक्ती आणि तिनं साध्य केलेले उत्तुंग यश साजरं करू या, म्हणजे भारताच्या लक्ष्मीचा सन्मान! आणि पाहता पाहता, याच्यानंतर लगेचच, समाज माध्यमांमध्ये असंख्य प्रेरणादायी कथांची रास लागली. वारंगळ इथल्या कोडीपका रमेश यांनी नमो अॅपवर लिहिलं की, माझी आई माझी शक्ती आहे. 1990 मध्ये जेव्हा माझ्या वडलांचे निधन झाले, तेव्हा माझ्या आईनेच पाच मुलांची जबाबदारी उचलली. आज आम्ही पाचही भाऊ चांगल्या व्यवसायांत आहोत. माझी आई हीच माझ्यासाठी ईश्वर आहे. माझ्यासाठी ती सर्व काही आहे आणि ती खऱ्या अर्थानं भारताची लक्ष्मी आहे.
रमेशजी, आपल्या माताजींना माझे प्रणाम! ट्विटरवर सक्रीय असलेल्या गीतिका स्वामी यांचं म्हणणं असं आहे की, त्यांच्यासाठी मेजर खुशबू कंवर भारताची लक्ष्मी आहेत, ज्या एका बस वाहकाची कन्या आहेत आणि त्यांनी आसाम रायफल्सच्या सर्व महिला तुकडीचं नेतृत्व केल होतं. कविता तिवारीजी यांच्यासाठी तर भारताची लक्ष्मी त्यांची कन्या आहे, जी त्यांची शक्तीसुद्धा आहे. त्यांची कन्या उत्तम पेंटिंग करते, याचा त्यांना अभिमान आहे. तिने सीएलएटीच्या परीक्षेत खूपच चांगली श्रेणीही प्राप्त केली आहे. तर मेघा जैन यांनी लिहिलं आहे की, 92 वर्षांची एक वयोवृद्ध महिला, ग्वाल्हेर रेल्वे स्थानकात प्रवाशांना मोफत पाणी पुरवत असते. मेघाजी या भारतातील लक्ष्मीची विनम्रता आणि करुणेच्या भावनेने खूप प्रेरित झाल्या आहेत. अशा अनेक कथा लोकांनी सांगितल्या आहेत. आपण त्या जरूर वाचा, प्रेरणा घ्या आणि स्वतःही असेच काही कार्य आपल्या आसपासच्या भागातही करा. माझं, भारताच्या या सर्व लक्ष्मींना आदरयुक्त नमन आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 17 व्या शतकातल्या सुप्रसिद्ध कवयित्री, सांची होनम्मा यांनी 17 व्या शतकात, कन्नड भाषेत एक कविता लिहिली होती. तेच भाव, ते शब्द भारताच्या प्रत्येक लक्ष्मीबद्दल आपण जे बोलत आहोत ना, असं वाटतं की, त्याचा पाया 17 व्या शतकातच रचला होता. किती सुंदर शब्द, किती सुंदर भावना आणि किती उत्तम विचार, कन्नड भाषेतल्या या कवितेत आहेत.
पैन्निदा पर्मेगोंडनु हिमावंतनु
पैन्निदा भृगु पर्चीदानु
पैन्निदा जनकरायनु जसुवलीदनू
अर्थात, हिमवंत म्हणजे पर्वताच्या राजाला आपली कन्या पार्वतीमुळे, ऋषी भृगु यांना आपली कन्या लक्ष्मी हिच्यामुळे आणि राजा जनक यास आपली कन्या सीतेमुळे प्रसिद्धी मिळाली. आमच्या कन्या, या आमचा गौरव आहेत आणि या कन्यांच्या महिम्यामुळेच, आमच्या समाजाची एक मजबूत ओळख आहे आणि त्याचं भविष्य उज्वल आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 12 नोव्हेंबर, 2019- हा तो दिवस आहे ज्या दिवशी जगभरात, श्री गुरूनानक देव यांचा 550 वा प्रकाश उत्सव साजरा केला जाईल. गुरूनानक देवजी यांचा प्रभाव भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये आमचे शीख बंधू आणि भगिनी वास्तव्य करून आहेत, जे गुरूनानक देवजी यांच्या आदर्शाप्रती संपूर्णपणे समर्पित आहेत. मी व्हँकुव्हर आणि तेहरानच्या गुरुद्वारांमधील माझी भेट कधी विसरू शकत नाही. श्री गुरूनानक देवजी यांच्याबद्दल असे खूप काही आहे, जे मी आपल्याला सांगू शकतो, पण त्यासाठी `मन की बात’चे अनेक भाग लागतील. त्यांनी, सेवाभावाला नेहमीच सर्वोच्च स्थानी ठेवलं. गुरूनानक देवजी असं मानत की, नि:स्वार्थ भावानं केलेल्या सेवाकार्याचे कोणतंच मोल होऊ शकत नाही. अस्पृष्यतेसारख्या सामाजिक दृष्ट्या वाईट प्रथेविरोधात ते खंबीरपणे उभे राहिले. श्री गुरूनानक देवजी यांनी आपला संदेश जगात, दूर दूरवर पोहचवला. आपल्या काळातले सर्वात जास्त प्रवास करणाऱ्यांपैकी ते होते. अनेक ठिकाणी गेले आणि जिथं गेले तिथं आपला सरळ स्वभाव, विनम्रता, साधेपणा यामुळे त्यांनी सर्वांची मनं जिंकली. गुरुनानक देवजी यांनी अनेक महत्वपूर्ण धार्मिक यात्रा केल्या, ज्यांना उदासी असं म्हटलं जातं. सद्भावना आणि समानतेचा संदेश घेऊन, ते, उत्तर असो की दक्षिण, पूर्व असो की पश्चिम, प्रत्येक दिशेला गेले, प्रत्येक ठिकाणी लोकांना, संताना आणि ऋषींना भेटले. आसामचे विख्यात संत शंकरदेव यांनीसुद्धा त्यांच्यापासून प्रेरणा घेतली होती, असं मानलं जातं. त्यांनी हरिद्वारच्या पवित्र भूमीची यात्रा केली. काशीमध्ये एक पवित्र ठिकाण `गुरूबाग गुरूद्वारा’ आहे, असं म्हटलं जातं की, श्री गुरूनानक देवजी तिथं उतरले होते. ते बौध्द धर्माशी जोडल्या गेलेल्या राजगिर आणि गयासारख्या धार्मिक स्थळीसुद्धा गेले. दक्षिणेत गुरूनानक देवजी यांनी श्रीलंकेपर्यंत प्रवास केला. कर्नाटकात बिदरला प्रवासाला गेले असताना, गुरूनानक देवजी यांनी, तिथल्या पाणी समस्येवर तोडगा काढला होता. बिदरमध्ये गुरूनानक जीरा साहब नावाचे एक प्रसिद्ध स्थळ आहे, जे गुरूनानक देवजी यांचं सतत आम्हाला स्मरण करून देतं, त्यांनाच ते समर्पित आहे. एका उदासीच्या दरम्यान, गुरूनानकजींनी उत्तरेत, काश्मीर आणि त्यांच्या आसपासच्या प्रदेशातही प्रवास केला. यामुळे, शीख अनुयायी आणि काश्मीरमध्ये खूप दृढ संबंध स्थापित झाले. गुरूनानक देवजी तिबेटमध्येही गेले, जिथल्या लोकांनी त्यांना गुरू मानले. उझबेकिस्तानमध्येही ते पूज्य आहेत, जिथं ते गेले होते. आपल्या एका उदासीदरम्यान, त्यांनी इस्लामी देशांचाही प्रवास केला होता, ज्यात सौदी अरेबिया, इराक आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. ते लाखो लोकांच्या मनात ठसले, ज्यांनी पूर्ण श्रद्धेनं त्यांच्या शिकवणीचं अनुसरण केलं आणि आजही करत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी, जवळपास 85 देशांचे राजदूत दिल्लीहून अमृतसरला गेले होते. तिथं त्यांनी अमृतसरच्या सुवर्णमंदिराचं दर्शन घेतलं आणि हीच घटना गुरूनानक देवजी यांच्या 550 व्या प्रकाश पर्वाचं निमित्त ठरली. तिथं या सर्व राजदूतांनी सुवर्ण मंदिराचं दर्शन तर घेतलं, शिवाय त्यांना शीख परंपरा आणि संस्कृतीबाबत जाणून घेण्याची संधी मिळाली. यानंतर अनेक राजदूतांनी सोशल मीडियावर तिथली छायाचित्रं टाकली. चांगल्या अनुभवांबद्दलही गौरवपूर्ण लिहिलं. गुरूनानक देव जी यांचे 550 वे प्रकाश पर्व त्यांचे विचार आणि आदर्श आपल्या जीवनात आणण्याची अधिक प्रेरणा आम्हाला देईल, अशी माझी इच्छा आहे. पुन्हा एकदा मी नतमस्तक होऊन गुरूनानक देव जी यांना वंदन करतो.
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, मला विश्वास आहे की, 31 ऑक्टोबर ही तारीख आपल्या सर्वाना स्मरणात निश्चित राहिली असेल. हा दिवस भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा आहे जे देशाला ऐक्याच्या धाग्यात गुंफणारे महानायक होते. एकीकडे, सरदार पटेल यांच्यामध्ये लोकांना एकत्र आणण्याची अद्भुत क्षमता होती, तर दुसरीकडे ज्यांच्याशी त्यांचे वैचारिक मतभेद होते, त्यांच्याशीही ते उत्तम मेळ बसवून घेत. सरदार पटेल लहान लहान गोष्टींकडेही अत्यंत खोलात जाऊन पहात असत, पारखून घेत. खऱ्या अर्थानं ते, तपशिलाचा आग्रह धरणारे ‘मॅन ऑफ डीटेल्स’ होते. याचबरोबर, ते संघटन कौशल्यात निपुण होते. योजना तयार करण्यात आणि रणनीती आखण्यात त्यांना प्रभुत्व मिळाले होते. सरदार साहेबांच्या कार्यशैलीबद्दल जेव्हा आपण वाचतो, ऐकतो तेव्हा त्यांचं नियोजन किती जबरदस्त होतं, हे लक्षात येतं. 1921 मध्ये अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो प्रतिनिधी येणार होते. अधिवेशनाच्या सर्व व्यवस्थेची जबाबदारी सरदार पटेल यांच्यावर होती. या संधीचा उपयोग त्यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी करून घेतला. कुणालाही पाण्याची कमतरता भासणार नाही, याची निश्चिती करण्यात आली. एवढेच नाही तर, त्यांना अधिवेशन स्थळी एखाद्या प्रतिनिधीचे सामान किंवा जोडे चोरीला जाण्याची काळजी होती आणि हे लक्षात घेऊन सरदार पटेल यांनी जे केलं, ते कळल्यावर आपल्याला खूप आश्चर्य वाटेल. त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधून खादीच्या पिशव्या बनवा, असा आग्रह धरला. शेतकऱ्यांनी तशा पिशव्या बनवल्या आणि प्रतिनिधींना विकल्या. या पिशव्यांमध्ये आपले जोडे घातल्यानं, आणि त्या पिशव्या आपल्याबरोबर ठेवल्यानं प्रतिनिधीच्या मनातला चपला चोरीला जाण्याचा तणाव निघून गेला. तर दुसरीकडे, खादीच्या विक्रीमध्ये खूप वाढ झाली. संविधान सभेत उल्लेखनीय भूमिका बजावल्याबद्दल आमचा देश, सरदार पटेल यांच्याप्रती कायम कृतज्ञ राहील. त्यांनी मूलभूत अधिकार निश्चित करण्याचं महत्वपूर्ण कार्य केलं, ज्यामुळे, जाती आणि संप्रदायाच्या आधारावर कोणताही भेदभाव करण्याला वाव राहिला नाही.
मित्रानो, भारताचे पहिले गृहमंत्री या नात्याने सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांचं एकत्रीकरण करण्याचं, एक खूप महान भगीरथ आणि ऐतिहासिक कार्य केलं. सरदार वल्लभभाई यांचं हेच वैशिष्ट्य होतं की, प्रत्येक घटनेवर त्यांची नजर असे. एकीकडे त्यांची नजर हैदराबाद, जुनागढ आणि इतर राज्यांवर केंद्रित होती तर दुसरीकडे त्यांचं लक्ष सुदूर दक्षिणेतील लक्षद्वीपवरही होतं. वास्तविक, जेव्हा आम्ही सरदार पटेल यांच्या प्रयत्नांबद्दल बोलतो, तेव्हा देशाच्या एकीकरणात काही खास प्रांतांच्याबाबत त्यांच्या भूमिकेची चर्चा होते. लक्षद्वीपसारख्या छोट्या जागेसाठीही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ही गोष्ट लोक कमीच स्मरणात ठेवतात. आपल्याला चांगलं माहित आहे की, लक्षद्वीप हा काही बेटांचा समूह आहे. भारतातील सर्वात सुंदर प्रदेशांपैकी एक आहे. 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर लगेचच आमच्या शेजाऱ्याची नजर लक्षद्वीपवर होती आणि त्याने आपला ध्वज घेऊन जहाज पाठवले होते. सरदार पटेल यांना जशी या घटनेची माहिती मिळाली,त्यांनी जराही वेळ न दवडता, जराही उशीर न करता, लगेच कठोर कारवाई सुरू केली. त्यांनी मुदलियार बंधू, अर्कोट रामस्वामी मुदलियार आणि अर्कोट लक्ष्मणस्वामी मुदलियार यांना सांगितलं की, त्याने त्रावणकोरच्या लोकांना घेऊन त्वरित तिकडे कूच करावं आणि तिथं तिरंगा फडकवावा. लक्षद्वीपमध्ये प्रथम तिरंगा फडकला पाहिजे. त्यांच्या आदेशानंतर लगेचच तिरंगा फडकवण्यात आला आणि लक्षद्वीपवर ताबा मिळवण्याचे शेजारी देशाचे मनसुबे पाहता पाहता उध्वस्त करण्यात आले. या घटनेनंतर सरदार पटेल यांनी मुदलियार बंधूना सांगितलं की, लक्षद्वीपला विकासासाठी प्रत्येक आवश्यक सहाय्य मिळेल, याची त्यांनी वैयक्तिक खात्री करावी. आज, लक्षद्वीप भारताच्या प्रगतीत महत्वपूर्ण योगदान देत आहे. हे एक आकर्षक पर्यटन स्थळसुद्धा आहे. मला आशा आहे की, आपण या सुंदर बेटांची आणि समुद्र किनाऱ्याची सैर कराल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 31 ऑक्टोबर, 2018 या दिवशी सरदार साहेबांच्या स्मृत्यर्थ उभारण्यात आलेला एकतेचा पुतळा देश आणि जगाला समर्पित केला गेला होता. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. अमेरिकेतल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याच्या दुप्पट त्याची उंची आहे. जगातली सर्वात उंच प्रतिमा प्रत्येक भारतीयाला अभिमानानं भरून टाकते. प्रत्येक भारतीयाची मान गर्वानं ताठ होते. आपल्याला आनंद होईल की, एका वर्षात, 26 लाखाहून अधिक पर्यटक, एकतेचा पुतळा पाहण्यासाठी तिथं गेले. याचा अर्थ असा आहे की, दररोज सरासरी साडेआठ हजार लोकांनी एकतेच्या पुतळ्याच्या भव्यतेचं दर्शन घेतल. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल त्यांच्या हृदयात जी आस्था, श्रद्धा आहे ती त्यांनी व्यक्त केली आणि आता तर तिथं निवडुंगाची बाग, फुलपाखरू उद्यान, जंगल सफारी, मुलांसाठी पोषण आहार पार्क, एकता नर्सरी असे अनेक आकर्षण केंद्र सातत्यानं विकसित होत चालले आहेत आणि यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे आणि लोकांना रोजगाराच्या नव्या नव्या संधीसुद्धा मिळत आहेत. येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधा लक्षात घेऊन, अनेक गावातील लोक आपापल्या घरांमध्ये, होम स्टे-ची व्यवस्था अशा सुविधा उपलब्ध करून देत आहेत. घरात मुक्कामाची सुविधा होम स्टे उपलब्ध करून देणाऱ्या लोकांना व्यावसायिक प्रशिक्षणही दिलं जात आहे. तिथल्या लोकांनी आता ड्रॅगन फ्रुटची शेतीही सुरू केली असून लवकरच हा तिथल्या लोकांच्या उपजीविकेचा प्रमुख स्त्रोत होईल, असा मला विश्वास आहे.
मित्रानो, देशासाठी, सर्व राज्यांसाठी, पर्यटन उद्योगासाठी, एकतेचा पुतळा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. एका वर्षात एखादे ठिकाण, जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून कसं विकसित होतं, याचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत. तिथं देश आणि परदेशातून लोक येतात. परिवहनाची, मुक्कामाची, गाईडची, पर्यावरण पूरक व्यवस्था, अशा अनेक व्यवस्था एकानंतर एक आपोआप विकसित होत चालल्या आहेत. खूप मोठी आर्थिक घडामोड होत आहे आणि प्रवाशांच्या गरजांनुसार लोक सुविधा निर्माण करत आहेत. सरकार आपली भूमिका निभावत आहे. मित्रांनो, गेल्या महिन्यात टाईम मासिकानं जगातल्या 100 महत्वपूर्ण पर्यटन स्थळांमध्ये एकतेचा पुतळा या स्थानाला अग्रस्थान दिलं आहे. आपण सर्व आपल्या बहुमुल्य वेळातून काही वेळ काढून एकतेचा पुतळा पाहायला तर जालच, अशी मला आशा आहे. पण माझा आग्रह आहे की, प्रत्येक भारतीय जो प्रवासाकरता वेळ काढतो, त्यानं भारतातल्या कमीत कमी 15 पर्यटन स्थळांचा प्रवास कुटुंबांसह करावा, जिथं जाईल तिथं रात्रीचा मुक्काम करावा, हा माझा आग्रह कायम राहील.
मित्रांनो, जसे की आपल्याला माहित आहे, 2014 पासून प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आम्हाला कोणतीही किंमत देऊन आपल्या देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेचे रक्षण करण्याचा संदेश देतो. 31 ऑक्टोबरला, दरवर्षीप्रमाणे, रन फॉर युनिटी – एकता दौडचं आयोजन केलं जात आहे. यात समाजातील प्रत्येक वर्गातील, प्रत्येक स्तरातले लोक सहभागी होतील. रन फॉर युनिटी या गोष्टीचं प्रतिक आहे की, हा देश एक आहे. एका दिशेनं चालतो आहे आणि एक लक्ष्य प्राप्त करू पाहतो आहे. एक लक्ष्य – एक भारत, श्रेष्ठ भारत!
गेल्या 5 वर्षामध्ये असं दिसलं आहे की – केवळ दिल्ली नव्हे तर भारतातल्या शेकडो शहरांमध्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये, राजधान्यांमध्ये, जिल्हा केंद्रे, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराची छोट्या शहरांमध्ये सुद्धा, पुरुष, स्त्रिया, शहरातले लोक, गावातले लोक, बालक, नवतरुण, वृद्ध, दिव्यांग, सर्व लोक खूप मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. तसंही, आजकाल पाहिलं तर लोकांमध्ये मॅराथॉनबाबत एक छंद आणि वेड दिसत आहे. रन फॉर युनिटी ही सुद्धा अशीच आगळीवेगळी तरतूद आहे. धावणं मन, मेंदू आणि शरीर सर्वांसाठी लाभदायक आहे. इथ तर धावायचंही आहे, फिट इंडियासाठी आणि त्याबरोबर एक भारत-श्रेष्ठ भारत या उद्देश्यानं आम्ही जोडले जात असतो. आणि यामुळे केवळ शरीर नाही तर मन आणि संस्कार भारताच्या एकतेसाठी, भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी धावायचं आहे. यासाठी आपण ज्या शहरात राहत असाल, तिथं आपल्या आसपास रन फॉर युनिटीच्या बाबतीत माहिती घेऊ शकता. यासाठी एक पोर्टल सुरू केलं आहे runforunity.gov.in या पोर्टलवर देशभरातल्या ज्या ठिकाणी रन फॉर युनिटीच आयोजन केलं जाणार आहे, त्या ठिकाणांची माहिती दिली आहे. आपण सर्व 31 ऑक्टोबरला निश्चित धावाल – भारताच्या एकतेसाठी, स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी सुद्धा!
माझ्या प्रिय देशवासियांनो, सरदार पटेल यांनी देशाला एकतेच्या धाग्यात बांधलं. एकतेचा हा मंत्र आमच्या जीवनात संस्काराप्रमाणे आहे आणि भारतासारख्या विविधतेनं भरलेल्या देशात प्रत्येक स्तरावर, प्रत्येक मार्गावर, प्रत्येक वळणावर, प्रत्येक मुक्कामावर, आपल्याला एकतेच्या या मंत्राला मजबुती देत राहिलं पाहिजे. माझ्या प्रिय देशवासियांनो, देशाची एकता आणि आपसातील सद्भाव यांना सशक्त करण्यासाठी आमचा समाज नेहमीच अत्यंत सक्रीय आणि सतर्क राहिला आहे. आम्ही आमच्या आसपास जरी पाहिलं तरी अशी अनेक उदाहरणे मिळतील, जे आपसातील सद्भाव वाढवण्यासाठी सतत काम करत असतात, पण अनेकदा असं होतं की, त्यांचे प्रयत्न, त्यांचं योगदान आपल्या स्मृतीपटलावरून खूप लवकर निघून जात.
मित्रांनो, मला लक्षात आहे की, 2010च्या सप्टेंबरमध्ये जेव्हा राम जन्मभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयानं आपला निकाल दिला होता. जरा ते दिवस आठवा, कसं वातावरण होतं. वेगवेगळ्या प्रकारचे किती लोक मैदानात आले होते. कसे हितसंबंधी गट त्या परिस्थितीचा आपापल्या परीनं फायदा घेण्यासाठी खेळ खेळत होते. वातावरण तापवण्यासाठी कोणत्या प्रकारची भाषा केली जात होती. भिन्न भिन्न आवाजात तिखटपणा भरण्याचा प्रयत्नसुद्धा केला जात होता. काही बोलघेवड्यांनी तर फक्त आणि फक्त चमकण्याच्या उद्देश्यानं काय काय वक्तव्यं केली होती, कशा बेजबाबदार गोष्टी केल्या होत्या, आम्हाला सर्व लक्षात आहे. पण हे सर्व पाच, सात, दहा दिवस चाललं, पण जसा निकाल आला, एक आनंददायक, आश्चर्यकारक बदल देशाला जाणवला. एकीकडे दोन आठवडे वातावरण तापवण्यासाठी सर्व काही झालं होतं, पण राम जन्मभूमीवर निकाल आला तेव्हा सरकार, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नागरी समाज, सर्व संप्रदायांचे प्रतिनिधी, साधू संतानी खूपच संयमी प्रतिक्रिया दिल्या. वातावरणातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न. पण आजही माझ्या लक्षात तो दिवस आहे. जेव्हा तो दिवस आठवतो तेव्हा मनाला आनंद होतो. न्यायपालिकेच्या प्रतिष्ठेला गौरवपूर्णरित्या सन्मान दिला आणि कुठेही वातावरण पेटवण्यास, तणाव पैदा होऊ दिला नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या आम्हाला खूप शक्ती देतात. एकतेचा सूर, देशाला किती ताकद देतो, हे याचं उदाहरण आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 31 ऑक्टोबरला आमच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्याच दिवशी झाली होती. देशाला मोठा धक्का बसला होता, मी आज त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज घराघरात कोणती एक कथा दूरवर ऐकू येत असेल, प्रत्येक गावाची एक कहाणी ऐकू येत असेल, उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम, भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात जी कहाणी ऐकू येत असेल तर ती आहे स्वच्छतेची. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक गावाला स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या सुखद अनुभव सांगावेसे वाटतात, कारण, स्वच्छतेचा हा प्रयत्न सव्वाशे कोटी भारतीयांचा प्रयत्न आहे. त्यांच्या परिणामांचे मालकसुद्धा सव्वाशे कोटी भारतीय आहेत. पण एक सुखद आणि मनोरंजक अनुभवसुद्धा आहे. मी ऐकला, मी विचार करतोय, तो आपल्यालाही सांगावा. आपण कल्पना करा, जगातली सर्वात उंचावरली युद्धभूमी जिथलं तापमान शून्य ते 50 ते 60 डिग्री उणे पर्यंत घसरतं. हवेत प्राणवायू नावालाच असतो. इतक्या कठीण परिस्थितीत इतक्या आव्हानांमध्ये राहणं हे सुद्धा पराक्रमापेक्षा कमी नाही. अशा बिकट परिस्थितीत आमचे बहाद्दर जवान छाती ताणून देशाच्या सीमांचं संरक्षण करत आहेतच, पण तिथं स्वच्छ सियाचीन अभियान चालवत आहेत. भारतीय लष्कराच्या या अद्भुत कटीबद्धतेसाठी मी देशवासीयांच्या वतीनं त्यांची प्रशंसा करतो. कृतज्ञता व्यक्त करतो. तिथं इतकी थंडी आहे की, काही विघटन होणंही अवघड आहे. अशा स्थितीत, कचऱ्याचे विलगीकरण आणि त्यांचे व्यवस्थापन करणे एक महत्वपूर्ण काम आहे. अशात, हिमनदी आणि तिच्या आसपासच्या भागातून 130 टन आणि त्यापेक्षा जास्त कचरा हटवणं आणि तेही अशा नाजूक पर्यावरणस्थितीत, किती मोठी ही सेवा आहे. ही एक अशी एको सिस्टीम आहे ज्यात हिमबिबट्या सारख्या दुर्मिळ प्रजातींचे घर आहे. इथं रानटी बोकड आणि तपकिरी अस्वल असे दुर्मिळ प्राणीही राहतात.आपल्या सर्वाना माहीत आहे की, सियाचीन असा भाग आहे की जो नद्या आणि स्वच्छ पाण्याचा स्त्रोत आहे. म्हणून इथं स्वच्छता अभियान चालवण्याचा अर्थ जे खालच्या भागांत राहतात त्यांच्यासाठी स्वच्छ पाण्याची सुनिश्चिती करणे असा आहे. त्याचबरोबर नुब्रा आणि श्योक अशा नद्यांच्या पाण्याचा उपयोग करतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो, उत्सव आपल्या सर्वांचं जीवनात एक नवीन चैतन्य जागवणारा पर्व असतो. आणि दिवाळीत तर खास करून, प्रत्येक कुटुंबात काही ना काही खरेदी, बाजारातून काही वस्तू आणणे हे होतच असते. मी एकदा म्हटल होतं की, आपण स्थानिक वस्तूंची खरेदी करण्याचा प्रयत्न करू, आमच्या गरजेची वस्तू जर गावात मिळत असेल तर तालुक्याला जायची गरज नाही. तालुक्यात मिळत असेल तर जिल्ह्यापर्यंत जायची गरज नाही. जितके जास्त आपण स्थानिक वस्तूची खरेदी करण्याचा प्रयत्न करू, तितकी ‘गांधी 150’ एक महान संधी होऊन जाईल. आणि माझा तर आग्रह असतो की, आमच्या विणकरांच्या हातानं बनवलेले, आमच्या खादीवाल्याच्या हातानं बनवलेलं काही तरी आपण खरेदी केलं पाहिजे. या दिवाळीतसुद्धा, दिवाळीच्या अगोदर आपण बरीच खरेदी केली असेल. पण असे अनेक लोक असतील जे दिवाळीनंतर गेलो तर थोडे स्वस्त मिळेल असा विचार करत असतील. असे अनेक लोक असतील ज्यांची खरेदी अजून राहिली असेल. दीपावलीच्या शुभकामना देतानाच मी आपल्याला आग्रह करेन की, या आपण स्थानिक वस्तूंच्या खरेदीसाठी आग्रही होऊ या, स्थानिक वस्तू खरेदी करू. महात्मा गांधी यांचं स्वप्न किती महत्वाची भूमिका निभावू शकते, पहा. मी पुन्हा एकदा या दीपावलीच्या पवित्र पर्वासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. दिवाळीत आपण तऱ्हेतऱ्हेचे फटाके उडवतो. पण कधी कधी बेसावध राहिल्यानं आग लागते. कुठे जखम होते. माझा आपणा सर्वाना आग्रह आहे की, स्वतःला सांभाळा आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करा.
माझ्या खूप खूप शुभकामना.
खूप खूप धन्यवाद!!!