पुण्याच्या सौंदर्यवती सुवर्णा झोरे-कोद्रे ठरल्या ‘मिस अँड मिसेस महाराष्ट्र-२०२१’च्या विजेत्या

385
पुणे : पुण्याच्या सौंदर्यवती सुवर्णा झोरे-कोद्रे नुकत्याच नवी मुंबई येथे झालेल्या ‘डायडेम मिस अँड मिसेस महाराष्ट्र २०२१’च्या विजेत्या ठरल्या आहेत. शारीरिक सौंदर्यासोबतच बौद्धिक, मानसिक सौंदर्याच्या स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवत झोरे यांनी ‘मिस अँड मिसेस महाराष्ट्र २०२१ – ब्युटी विथ पर्पज’ हा किताब पटकावला. महिलांच्या बाबतीतील ‘मासिक सत्य’ या विषयावर जागृती व मदत करण्याच्या उद्देशाने नुकतीच ही स्पर्धा पार पडली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कम्प्युटर सायन्समध्ये पदवीचे शिक्षण घेतलेल्या सुवर्णा झोरे यांनी आयटी क्षेत्रात विविध पदांवर काम केले असून, सध्या त्या जर्मनीमध्ये व्होडाफोन कंपनीत सॉफ्टवेअर प्रोग्राम मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. याआधीही सुवर्णा झोरे यांना नोकरीनिमित्त लंडन व अन्य देशात जाण्याची, वास्तव्य करण्याची संधी मिळाली होती. सामाजिक कार्यात झोरे यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. मुलींचे शैक्षणिक पालकत्व, सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेतील मुलींना मदत व मार्गदर्शन, बालग्राम संस्थेला देणगी स्वरूपात त्या मदत करतात.
यावेळी बोलताना सुवर्णा झोरे-कोद्रे म्हणाल्या, “सामाजिक भावनेतून ही स्पर्धा होत असल्याने त्यात सहभागी झाले. जवळपास १८०० महिला यात सहभागी झाल्या होत्या. महिलांवर अत्याचाराविरोधात जागृती करणारे नाटक सादर केले होते. फोटोशूट, प्रश्नोत्तरे, रॅम्पवॉक अशा विविध फेऱ्या झाल्या. अंतिम फेरीत एकूण ३७ स्पर्धक निवडण्यात आले होते. अंतिम फेरीत मला विजेतेपद मिळाले, याचा आनंद आहे. या यशामुळे मला वेगळी ओळख मिळाली. त्याचा उपयोग आता महिलांच्या मासिक पाळीचे प्रश्न सोडवणे, सॅनिटरी नॅपकिनचा वापर वाढवणे, यासाठी करणार आहे. मानसिक दृष्ट्या कमकुवत मुलांसाठी मला काम करायचे आहे.”
“महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा मला आई-वडील आणि पतीकडून मिळाली. कुटुंबातील सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. शारीरिक सौंदर्यापेक्षा वैचारिक सौंदर्य अधिक महत्वाचे आहे, असे वाटते. यापुढे नाटक, जाहिरात, फॅशन क्षेत्रातून मिळणारे संपूर्ण पैसे महिलांच्या आरोग्यासाठी वापरणार आहे. समाजातील गैरसमज, रूढी-परंपरा याबाबत जागृती करून महिलांना सुरक्षित आरोग्य देण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणार आहे,” असेही सुवर्णाचे झोरे-कोद्रे यांनी नमूद केले.