Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेबालदिनी मुलांनी केली पर्यावरणाशी बांधील राहण्याची प्रतिज्ञा

बालदिनी मुलांनी केली पर्यावरणाशी बांधील राहण्याची प्रतिज्ञा

पुणे, प्रतिनिधी – मयूर कॉलनी येथील सोलॅरीस मध्ये बालदिन अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. ‘सेव्ह अवर सोल्स’ असे नाव असलेल्या या कार्यक्रमात ‘निसर्गस्नेही जीवनशैलीकडे’ आणि ‘मोबाईल व मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचे दुष्परिणाम आणि उपाय’ या विषयावर तज्ज्ञांनी मुलांबरोबर सोप्या भाषेत संवाद साधला. यावेळी कार्यक्रमात ऐकलेल्या विषयांनी प्रेरित होऊन मुलांनी पर्यावरणाशी बांधील राहण्याची प्रतिज्ञा केली.

बालदिनाचे औचित्य साधून हेल्थ क्लब या नात्याने ‘सोलॅरीस’चे संस्थापक जयंत पवार यांच्या संकल्पनेतून बालचमू आणि त्यांच्या पालकांसाठी या कार्यक्रमाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते. रांगोळ्या आणि फुलांच्या सजावटीने मुलांचे स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी ‘पर्यावरणस्नेही जीवनशैली’ कशी जगावी ? या विषयांवर पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांनी आपल्या व्याख्यानातून प्रखर प्रकाश टाकला. आपली जीवनशैली बदलून पर्यावरणाचा ऱ्हास आपण कसा टाळू शकतो याचे मार्गदर्शनही त्यांनी केले. तर सुरेश कर्वे आणि मिलिंद बेंबाळकर यांनी त्यांच्या व्याख्यानातून मोबाईल फोन आणि मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचे दुष्परिणाम मुलांना ध्वनिचित्रफिती द्वारे समजावून सांगितल्यावर लहानांबरोबरच मोठेही अंतर्मुख झाले. ते व्याख्यान ऐकल्यावर तिथे जमलेल्या लहान मुलांनी उत्स्फूर्तपणे आम्ही मोबाईल फोनला हात लावणार नाही असे ठरवून टाकले.

सरतेशेवटी लहानमुलांनी ‘भारतमातेच्या प्रतिज्ञे’च्या धर्तीवर पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बांधील राहण्याची प्रतिज्ञा केली. सोलॅरिसचे सीइओ ऋषिकेश भानुशाली यांनी मान्यवर वक्त्यांचे सत्कार केले आणि राजेश सपकाळ यांनी आभार प्रदर्शन तर रश्मी सातव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना तुळशीचे रोप देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!