Wednesday, February 19, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणे‘आटपाडी नाईट्स’ साठी सुबोध भावे बनला प्रस्तुतकर्ता

‘आटपाडी नाईट्स’ साठी सुबोध भावे बनला प्रस्तुतकर्ता

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमात वैविध्यपूर्ण भूमिकांमधून अभिनेता सुबोध भावेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच चित्रपट दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही त्याने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटविला आहे. सुबोध आता पुन्हा एकदा नव्या इनिंग साठी सज्ज झाला असून तो ‘आटपाडी नाईट्स’या चित्रपटाच्या माध्यमातून प्रस्तुतकर्ता म्हणून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

‘लोकमान्य’, ‘बालगंधर्व’, ‘… आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ असे चरित्रपट असो की ‘तुला पाहते रे’ मधील खलनायकी छटा असलेला विक्रांत सरंजामे किंवा ‘अश्रूंची झाली फुले’ मध्ये रंगमंचावर बिनधास्त वावर असलेला लाल्या, माध्यम कोणतेही असो सुबोध भावेने प्रत्येक व्यक्तीरेखेला आपल्या अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. अभिनेता म्हणून दमदार वाटचाल सुरु असताना त्याने चित्रपट दिग्दर्शनात पाउल टाकले आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकाला चित्रपटरुपात प्रेक्षकांसमोर आणण्याची कामगिरी उत्तम निभावली. तर ‘पुष्पक विमान’ या चित्रपटातून निर्माता म्हणून पदार्पण करत एक वेगळा विषय प्रेक्षकांपुढे आणला. यानंतर आता चित्रपट क्षेत्रातील अजून एक शिखर सर करण्यास सुबोध भावे सज्ज झाला असून प्रस्तुतकर्ता म्हणून ‘आटपाडी नाईट्स’ हा त्याचा पहिला चित्रपट असणार आहे. मायदेश मिडिया निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केले असून त्यांचा ‘बडे अब्बू’ हा चित्रपट गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या ५० व्या इफ्फी मध्ये झळकला होता. ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्री सायली संजीव या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात असलेल्या इतर कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती गुंफण्यात आलेल्या ‘आटपाडी नाईट्स’ची कथा एका संवेदनशील विषयावर अतिशय वेगळ्या अंदाजात, खुमासदार शैलीत भाष्य करणारी असल्याचे समजते. ‘आटपाडी नाईट्स’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!