‘पेठ’ चित्रपटाचे संगीत अनावरण

697

प्रेमासाठी सगळी बंधने झुगारत, आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य करणारी ‘पेठ’ या आगामी चित्रपटाची कथा आहे. नकळत घडणाऱ्या अलवार प्रेमाची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा नुकताच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ‘शारदा फिल्म प्रोडक्शन’ ची प्रस्तुती असलेल्या ‘पेठ’ चित्रपटाचे निर्माते श्री. विरकुमार शहा तर दिग्दर्शक अभिजीत साठे आहेत.

वेगवेगळ्या जॉनरची पाच गाणी या चित्रपटात आहेत. अभिजीत साठे,  पी.शंकरम, मुराद तांबोळी यांच्या लेखणीने सजलेल्या गाण्यांना ज्ञानेश्वर मेश्राम, पी.शंकरम, कार्तिकी गायकवाड, उर्मिला धनगर, अनुराधा गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. या गाण्यांना पी.शंकरम यांच्या संगीताची साथ लाभली आहे. समाजातील दोन भिन्न वर्गातल्या प्रेमवीरांची ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भावेल असे मत दिग्दर्शक अभिजीत साठे यांनी व्यक्त केले. अनेक वेगळ्या धाटणीचे सिनेमे मराठीत येत आहेत. ‘पेठ’ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी ठरेल अशा भावना मेघराज राजेभोसले यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.

वृषभ शहा आणि नम्रता रणपिसे ही नवी जोडी ‘पेठ’ या चित्रपटाचा निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. यासोबत निशिगंधा वाड, महेशदादा देवकाते, सायली शिंदे, अभिषेक शिंदे, विशाल टेके, सुरज देसाई, विकास कोकरे, महेश पांडे, प्रियांका उबाळे, रुक्सार परवीन, अस्मिता पन्हाळे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचे लेखन, पटकथा, संवाद तसेच कलादिग्दर्शन अभिजीत साठे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी गजानन शिंदे यांनी सांभाळली आहे. छायांकन ऋषिकेश पाटील, सुरज चव्हाण तर रंगभूषा अमृता गायकवाड, कमलाकर चव्हाण यांची आहे. या चित्रपटाचे संकलन चेतन सागडे यांनी केले आहे.

नेत्रसुखद आणि सुश्राव्य संगीताने नटलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या  संगीत अनावरण सोहळ्यात विशेष उपस्थिती ठरली ती सुरेल गायिका कार्तिकी गायकवाड हिची. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिग्दर्शक प्रकाश धींडले यांनी केले.