कोरोनाच्‍या दोन व्‍यक्‍तींना डिस्‍चार्ज- विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर

678

पुणे प्रतिनिधी,

जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या पहिल्‍या ज्‍या दोन व्‍यक्‍ती अॅडमिट झाल्‍या होत्‍या, त्‍यांच्‍या दोन्‍ही टेस्‍ट निगेटीव्‍ह आल्‍या आहेत, त्‍यामुळे आज त्‍यांना डीस्‍चार्ज दिला आहे. दुस-या दिवशी जे तीन पेशंट अॅडमिट झाले होते, त्‍यांच्‍या पहिल्‍या टेस्‍ट निगेटीव्‍ह आल्‍या आहेत, आज त्‍यांच्‍या दुस-या टेस्‍ट घेत आहोत, त्‍या निगेटीव्‍ह आल्‍या तर त्‍यांना उद्या डिस्‍चार्ज दिला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली. गुढीपाडव्‍याच्‍या शुभेच्‍छा देतांनाच सर्वांच्‍या मदतीने कोरोनावर मात करु, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

पुणे विभागातील कोरोनाच्‍या सद्यस्‍थ‍ितीची माहिती देतांना विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, पुणे विभागात एकूण 825 नमुने घेतले होते, त्‍यापैकी 737 चे अहवाल प्राप्‍त झाले. यामध्‍ये 692 अहवाल निगेटीव्‍ह आले आहेत तर 37 अहवाल पॉझिटीव्‍ह आले आहेत. याचा अर्थ जवळ-जवळ 90 टक्‍के अहवाल निगेटीव्‍ह आलेत, ही समाधानाची बाब आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे. त्‍याचे नागरिकांनी कुठेही उल्‍लंघन करु नये, असे आवाहन करुन ते म्‍हणाले, या 21 दिवसांत आपल्‍या सर्वांची साथ, सर्वांचे सहकार्य या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी मदत करु शकते. कोणत्‍याही जीवनावश्‍यक वस्‍तू म्‍हणजे औषधी, भाजीपाला, अन्‍नधान्‍य आपल्‍यापर्यंत पोहोचवण्‍याचा आमचा आटोकाट प्रयत्‍न राहील, प्रशासन यासाठी नियोजन करत आहे. आपण या नियोजनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

आरोग्‍य यंत्रणेने पहिले दोन पेशंट बरे व्‍हावे, यासाठी रात्रंदिवस अथक प्रयत्‍न केले. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच विभागाच्‍या इतर जिल्‍ह्यातील अधिकारी हे कोरोनाच्‍या प्रतिबंधासाठी काम करीत आहे, या सर्वांचे त्‍यांनी कौतुक केले. तसेच काही कर्मचारी आदेशाचे उल्‍लंघन करुन निघून जात असतील तर त्‍यांच्‍यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशाराही डॉ. म्‍हैसेकर यांनी दिला. या संकट समयी कुठेही डगमगून जावू नका, आपण सर्व एकत्र मिळून कोरोनावर मात करु या, असे आवाहन करुन स्‍वत:ला सुरक्षित ठेवा, त्‍याच बरोबर सगळयांना सुरक्षित ठेवा, असेही ते म्‍हणाले.