पुणे प्रतिनिधी,
पुणे शहरानजीक पुनावळे हायवे ब्रीज जवळील, डांगे चौकातील कोयते वस्तीत राहणाऱ्या वैदू समाजाच्या सुमारे शंभर कुटुंबावर, करोनाच्या जागतिक संकटामुळे अक्षरशः उपासमारीची वेळ आली असुन त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक सहारा नसल्याने, त्या समाजाची कुटूंबेच हवालदिल झाले होते.
याबाबतची माहिती पुणे शहरातील पुर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांच्या कानावर येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, शहर वाहतूक विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांना निर्देश देऊन प्रत्येक कुटुंबाला किमान आठवडाभर पुरेल अशा विविध धान्याच्या शंभर बॅग्ज उपलब्ध करून, सदर ठिकाणी संकटात असलेल्या वैदू समाजाच्या कुटूंबीयांना शिस्तबध्द पध्दतीने वितरण केले.
सदर धान्य वितरण कार्यक्रमास सुनील फुलारी हे जातीने हजर होते. सदर धान्याच्या वितरणासाठी मार्केट यार्डातील महावीर प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे देखील सहकार्य लाभले.
पुणे पोलीस दलाकडून अचानक व अनपेक्षितपणे आलेल्या या मदतीने संकटात सापडलेल्या वैदू समाजाच्या कुटूंबातील सदस्यांना समाधानासह पोलीसांच्या आतील माणुसकीचा ओलावा ही जाणवला. या सामाजिक कार्याची क्षणचित्रे पण कदाचित हेच सांगत आहेत.