कोरोना मुक्तीच्या लढयात परिचारिकांचे योगदान महत्वाचे -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

1113

जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयुक्तांच्या परिचारिकांना शुभेच्छा 

पुणे प्रतिनिधी,

 कोरोना मुक्तीच्या लढयात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लाऊन रुग्णालयातील परिचारिका जोखीम पत्कारुन चांगली आरोग्य सेवा देत आहेत. या सर्व परिचारिकांचे योगदान महत्वाचे आहे, असे गौरवोद्गार विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज काढले.
बै.जी. वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या सभागृहात जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन व प्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करुन डॉ.म्हैसेकर यांनी केले ,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, उपअधिष्ठाता डॉ.कार्यकर्ते, अधीक्षक डॉ.अजय तावरे, उपअधीक्षक डॉ.बी.जे. जाधव, अधिसेविका डॉ. राजश्री कोटके आदी उपस्थित होते. यावेळी अधिसेविका डॉ.राजश्री कोटके यांनी उपस्थित परिचारिक व परिचारिकांना आरोग्य सेवेची शपथ दिली.
डॉ. दिपक म्हैसेकर यांनी जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले, रुग्णालयामध्ये परिचारिका आपल्या कुटुंबाची काळजी न करता अपुऱ्या मनुष्यबळात सुध्दा दिवसरात्र तत्परतेने चांगली सेवा देवून आरोग्य सेवेचा दर्जा उंचावत आहेत. कोरोना मुक्तीच्या या लढयात त्यांचे योगदान महत्वाचे असून आरोग्य सेवेमधील परिचारिका एक महत्वाचा घटक आहे. परिचारिकांनी त्यांच्या या अखंड आरोग्य सेवेतून मानवतेचे दर्शन घडवले आहे. तसेच परिचारिकेबरोबरच परिचारकही अहोरात्र सेवा देत आहेत. जगावर कोरोनाचे संकट असतांना असंख्य परिचारिका व परिचारक बंधू रुग्णांसाठी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोना मुक्तीच्या लढयातील परिचारक बंधू आणि भगिणींचे हे योगदान कोणीही विसरु शकरणार नाही, अशा शब्दात जागतिक परिचारिका दिनाच्या गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या व आभार मानले.
अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे म्हणाले, परिचारिका या आरोग्य सेवेतील महत्वाचा घटक असून सध्याच्या कोरोना मुक्तीच्या लढयात त्या उत्कृष्टरित्या आपली सेवा बजावत आहेत. त्यांच्या या सेवेला मी सलाम करतो, अशा शब्दात त्यांनीही सर्व परिचारिकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संगीता भुजबळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.मृदुला फुले यांनी मानले.
कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रुग्णालयात कोरोना शॅम्पल तपासणीच्या लॅबला भेट देवून पहाणी केली व कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा बैठक घेवून आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारक, परिचारिका उपस्थित होत्या.
०००००