गिरीश भोपी, रायगड,
युगनिर्माते प्रतिष्ठान, बांधिलकी प्रतिष्ठान आणि रॉयल ग्रुप या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून ०४ एप्रिल २०२० ते ०३ मे २०२० पर्यंत नवी मुंबई येथे गरजूंना अन्नदान सेवा चालू होती. अन्नदान सेवेनंतर धान्यवाटप उपक्रम हाती घेण्यात आला. धान्यवाटप उपक्रमात या तिन्ही संस्था आणि यारी ग्रुप फाऊंडेशन, कळंबोली यांचा समावेश होता. १४ मे, २०२० रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त वरील सर्व संस्थेच्यावतीने घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सी.बी.डी. बेलापूर, कळंबोली, खांदा कॉलनी येथे एकूण ९३ गरजू कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आले.
सर्वांनी कृतीशील सहभाग नोंदवल्यामुळे उपक्रम यशस्वी पार पडला असे मत युगनिर्माते प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर वसमाने यांनी व्यक्त केले. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि सबंध महाराष्ट्र आणि विदेशातूनही मदतीचे हात पुढे आले असे मत बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पल्लवी निंबाळकर यांनी व्यक्त केले. कळंबोलीमध्ये आवाहन केल्यावर तरुण एकत्र आले आणि अवघ्या दोन दिवसांत मोठ्या स्वरुपात मदत जमा झाली त्यामुळे उपक्रम उत्तम पद्धतीने पार पडला असे मत यारी ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष तेजेश नारनवर यांनी व्यक्त केले. कोरोनाचे संकट असतानाही नागरिकांनी माणुसकी जपली या शब्दात रॉयल ग्रुपचे अध्यक्ष सागर गव्हारे यांनी मत व्यक्त केले. सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांच्या मेहनतीमुळे हा उपक्रम शक्य झाला आणि या कार्यात किल्ले बेलापूर समन्वय समितीची विशेष मदत मिळाली. तसेच विविध संस्था, ग्रुप, उद्योजक, मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांनीही मदत करुन सामाजिक बांधिलकी जपली असे मत बांधिलकी प्रतिष्ठानचे सरचिटणीस गौरव शिंदे यांनी व्यक्त केले. छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सर्वांनी शंभूराजेंचे विचार असेच आत्मसात करुन समाजकार्य अखंड चालू ठेवण्याचा मानस केला.