Wednesday, February 19, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीआषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय - उपमुख्यमंत्री अजित...

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे प्रतिनिधी

आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे-पाटील, राजाभाऊ चोपदार, विशाल मोरे, माणिक मोरे, सोपानदेव देवस्थान सासवडचे गोपाळ गोसावी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे, वारीची ही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. वारीची ही परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी राज्यातील प्रमुख व सबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थांनच्या पादुकांना राज्यशासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहचविण्यात येईल. विमान तसेच हेलिकॉप्टर बाबत हवामानाचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय राज्य सरकार राखून ठेवत आहे. याबाबतचा निर्णय घेतांना संबंधित संस्थानला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही या संतांनी दिलेल्या शिकवणीचा आदर करुया, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी वारीसाठी आपण सर्वांनी शासनाकडे सकारात्मक भूमिका मांडली व शासनाच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत केले ही कौतुकास्पद बाब आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे गेल्या अडीच महिन्यापासून सर्व धर्मीयांनी आपले धार्मिक कार्यक्रम घरात राहुनच साजरे केले आहेत. हाच आदर्श समोर ठेवून या वर्षीचा आषाढी वारीचा कार्यक्रम गर्दी न करता शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करुन परंपरा कायम ठेवायची आहे. या सोहळ्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. याबाबतची सर्व ती खबरदारी राज्यशासन घेणार असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.
राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या परवानगी शिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नसल्याचे सांगतानाच राज्यातील वारकरी संप्रदायाच्या सकारात्मक भुमिकेबद्दल त्यांनी आभार मानले. दुरदर्शन तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवरुन आषाढी वारीचा आनंद घरबसल्या अनुभवता येणार आहे. वारकरी संप्रदाय व सर्वांनी पांडुरंगाचे दर्शन घरातूनच घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर प्रास्ताविक करतांना म्हणाले, आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत आपण 15 मे रोजी बैठक घेतली. मात्र पंधरा दिवसात पालखी मार्गक्रमण करीत असलेल्या पुणे, सातारा, सोलापूर, या तीनही जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढली आहे. पुढील कालावधीत रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पंढरपूर येथेही रुग्ण आढळले आहेत. एकुणच पुणे विभागात सांगली जिल्ह्याचा अपवाद वगळता चारही जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत शासनानाच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
राज्यशासनाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे वारकरी निश्चितपणे स्वागत करतील, असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे बैठकीत सहभाग घेतला. तसेच यावेळी संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त यांनीही व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे आषाढी वारीच्या आयोजनासंदर्भात आपली मते मांडली.
या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरूप, सहभागी वारकरी, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!