कोरोनाचा बाऊ करुन मालक वर्गाने कामगाराचें शोषण करु नये – डॉ. रघुनाथ कुचिक

383

पुणे (प्रतिनिधी): कोरोना काळात उद्योग क्षेत्राला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला. ज्यांचे कुटुंब अल्प उत्पन्न गटात होते त्यांचे आतोनात हाल झाले. असंघटीत कामगारांची तर वाताहात याकाळात झाली. कामगारांसंबंधी जी मूलभूत तत्त्वे आहेत त्यात कोणालाही तडजोड करता येणार नाही, करोनाच्या आडून उद्योजकांनी मानवी हक्कांचे उल्लंघन करू नये, तसेच कामगारांची पिळवणूक करून त्यांच्या आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी दिला.

पिरंगुट येथील रोची इंजिनियर्स मधील भारतीय कामगार सेनेच्या नवीन युनिट नामफलक उद्घाटन डॉ. रघुनाथ कुचिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तुकाराम केमसे, बाळु नरवडे, जीवन शिंदे, श्याम भेगडे, रविंन्द्र सातव, बाळासाहेब चादेंरे, नानासाहेब शिंदे, भानुदास पानसरे, राम गायकवाड, नवनाथ भेगडे, ज्ञानेश्वर डफळ, सदींप आमले, बाळासाहेब भितांडे, संदिप भेगडे, नारायण अडसुळ, कृष्णा पानसरे, सुनिल शिदें आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कंपन्यांनी कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात नोकर कपात करु नये, कामगार प्रामाणिकपणे काम करीत आहेत. कारखान्याची उन्नती व्हावी, यासाठी दिवसरात्र घाम गाळत आहेत. कोरोना महामारी संकटाचा गैरफायदा काही उद्योजक व उद्योग उठवत आहेत. उद्योग उभे राहिले पाहिजेत, तरुणांच्या हातांना काम मिळाले पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची प्रामाणिक भूमिका आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून अनेक उद्योगांनी वर्षानुवर्षे काम करीत असलेल्या कायम कामगारांनाही कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून थेट कमी करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात अशा स्वार्थी पद्धतीने काम करणाऱ्या उद्योगांवर भारतीय कामगार सेनेची करडी नजर आहे. कामागारांना न्याय मिळालाच पाहिजे, हीच आमची भूमिका असल्याचे डॉ. कुचिक म्हणाले.