आळंदीतून माऊलींचे पादुका पालखी सोहळ्याचे हरिनाम गजरात प्रस्थान

1046

आळंदी (अर्जुन मेदनकर) : वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेली तुळशीमाळ, हातात भगव्या पताका मुखाने हरिनामाचा गजर करीत यावर्षी कोरोनाचे महामारीचे संकटाचे सावटात मोजक्या लोकांचे उपस्थितीत जमावबंदी, संचारबंदीसह पोलीस बंदोबस्तात माउलींच्या पादुकांचे प्रस्थान पंढरी भक्ती मार्गातील दैवत श्री विठ्ठल भगवान पांडुरंगाचे दर्शन आणि वारीला जाण्यास माउली मंदिरातील विना मंडपातून शुक्रवारी (दि.२ ) सायंकाळी सव्वा सहाचे सुमारास हरिनाम गजरात झाले. यावर्षी प्रस्थानला मात्र लाखो वारकरी भाविकांची गर्दी नसल्याने हरिनाम गजरात अगदी मोजक्या वारकरी, भाविकांचे उपस्थितीत झाले. यावर्षीही प्रस्थान सोहळा थेट प्रक्षेपण असल्याने भाविकांनी आपापल्या घरात राहून सुरक्षित पणे पाहत आनंदवारी सोहळ्याचा आनंद घेतला.

माऊलींचे पादुका पालखी सोहळ्यास पुणे जिल्हा सत्र न्यायाधिश एन.पी.धोटे, खासदार बंडू जाधव, विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे, डॉ.राम गावडे, उर्जितसिंह शितोळे सरकार, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील, विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर,राजेंद्र आरफळकर,कृषिकेश आरफळकर, प्रांत विक्रांत चव्हाण, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, मंडलधिकारी चेतन चासकर, पोलीस उपायुक्त मितेश गट्टे, प्रेरणा कट्टे, मंचक इप्पर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, श्रींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, रामभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे, व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, रोहिदास तापकिर, गटनेते पांडुरंग वहिले,प्रशांत कु-हाडे, आदित्य घुंडरे, मानकरी बाळासाहेब कु-हाडे, योगेश आरु, अनिल

कु-हाडे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले, तलाठी विकास नरवडे, फडकरी, दिंडीकरी, मानकरी आदी निमंत्रित उपस्थित होते. पुजारी अमोल गांधी, महेश जोशी, राजाभाऊ थेटे, योगेश चौधरी, आदित्य जोशी, यज्ञेश जोशी, राजाभाऊ चौधरी आदींनी पौरोहित्य केले.

प्रस्थान सोहळ्याचे नियोजन यावर्षी थेट शासनाचे हस्तक्षेपात शासनाचे मान्यतेने मोजक्या लोकांत झाले. यावर्षीही सोहळ्यावर कोरोना या महामारीचे संकट असल्याने पुरेशी दक्षता व काळजी घेत महसूल व पोलीस प्रशासनाने नियोजन करून आळंदी देवस्थानसह सोहळ्यातील संबंधित घटकांना विश्वासात घेऊन करण्यात आले. यास आळंदीकर नागरिक व भाविकांनी ही मोठा प्रतिसाद दिला.

अलंकापुरीत प्रस्थान सोहळ्या पूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. मंदिरात भाविकांना दर्शनास बंदी असल्याने यावर्षी श्रींचे संजीवन समाधी दर्शनास भाविक वंचित राहिले. दरम्यान नऊ वाजता वीणा मंडपात परंपरेने कीर्तन सेवा झाली. दुपारी परंपरेने मंदिरात श्रीनां महानैवेद्य झाला. यासाठी प्रथम सेवेकरी व स्वच्छता स्वयंसेवक यांनी श्रींचा गाभारा स्वच्छ केला.

यावर्षी पालखी पायी वारी सोहळा रद्द झाल्याने सोहळ्यातील इतर कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. सोहळ्यास यावर्षी थेट सुरुवात करण्यात आली. दरवर्षी प्रस्थान दिनी दुपारी अडीच ते साडेतीनच्या सुमारास श्रींचे रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात सोहळ्यातील परंपरे प्रमाणे चोपदार यांचे सूचनां प्रमाणे महाद्वारातून प्रवेश देण्यात येतो मात्र यावर्षी दिंड्या एवजी संबंधित घटकांचे स्थानिक प्रतिनिधी यांना प्रवेश देण्यात आला. दरम्यान श्रींचे मंदिरात माउलींच्या समाधीवर ब्रह्मवृंदाच्या वतीने श्रीनां वैभवी पोशाख झाल्यानंतर श्री गुरू हैबतरावबाबांच्या वतीने माउलींच्या समाधीची परंपरेने आरती हरिनाम गजरात झाली. त्यानंतर माउली संस्थांनचे तर्फे श्रींची आरती करण्यात आली. दरम्यान श्रींचे वैभवी चांदीचे पादुका प्रस्थान पूर्व चल पादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाली. या वेळी सोहळ्यातील नियमा प्रमाणे आळंदी संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना पागोटे वाटप, श्रीगुरू हैबतरावबाबांच्या वतीने दिंडीप्रमुखांना पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते नारळ प्रसाद वाटप झाले. श्रींचे संजीवन समाधी गाभाऱ्यात आळंदी देवस्थान च्या वतीने परंपरेने मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. परंपरेने धार्मिक उपक्रम होताच श्रींचे पालखीचे प्रस्थांनसाठी सूचना झाली. हरिनाम गजर करीत माउलींच्या पादुका मालक राजेंद्र आरफळकर यांचे हातात सुपूर्द करण्यात आल्या. विना मंडपातून सायंकाळी पंढरीकडे प्रस्थान ठेवले. माऊलींचे पादुकांचे हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर श्रींचे पादुका आजोळघरा लगतच्या दर्शनबारीतील सभागृहात हरिनाम गजरात आणण्यात आल्या. येथे सोहळ्यातील परंपरांचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा पालखी सोहळा विसावला. आळंदीत यावर्षीही कोरोनाचे संकटामुळे सोहळा आळंदीतच मुक्कामी राहणार आहे. सोमवारी (दि.१९ ) ला श्रींचे चलपादुका बस ने पंढरपुराला आषाढी एकादशी सोहळ्यास मार्गस्थ होणार आहे. यावर्षीची पायी वारी रद्द झाल्याने अनेक वारकरी वारीला जाण्याची इच्छा असूनही सुरक्षिततेच्या कारणास्तव न जाता घरी राहून वारीत श्रींचे दर्शन थेट प्रक्षेपणातून घेतले. यासाठी नियोजन करण्यात आले होते.