‘चित्र मराठी’ या नव्या प्लॅटफॉर्मची ओटीटीवर दमदार एंट्री

1001

मंदार काणे आणि समीर पौलस्ते निर्मित ‘चित्र मराठी’ हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म रसिकांच्या भेटीस

आताच्या घडीला ओटीटी प्लॅटफॉर्म सर्वच रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. कोरोनामुळे चित्रपटसृष्टीला लागलेल्या ब्रेकमध्ये ओटीटीने रसिकांचे मन जिंकले. मनोरंजन दुनियेतील ओटीटी हा एक प्रमुख घटक बनला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वेगळ्या दृष्टिकोनातून आणि आशयघन विषय घेऊन हे ओटीटी प्लॅटफॉर्म कायमच तत्पर असतात. कलाकारांना घेऊन प्रेक्षकांच्या सेवेस तत्पर अशा चित्र मराठी.. मनोरंजन घराघरांत, मनोरंजन मनामनात ने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार एंट्री केली आहे. आता नव्या रूपात भेटीला आलेला हा ओटीटी प्लॅटफॉर्म चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, अध्यात्म असा बराच कंटेन्ट या प्लॅटफॉर्मवर हाताळला जाणार आहे. कलाकारांना सोबत घेऊन रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सुरुवातीला एक नव्हे दोन नव्हे तर दहा वेबसिरीज येथे प्रदर्शित करण्यात येणार आहे.

‘मंदार काणे एंटरटेनमेंट’ आणि ‘स्पार्कल्स९ मीडिया’ निर्मित चित्र मराठी या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली असून नुकतेच याचे नाव आणि लोगो अनावरण सोहळा दिमाखात पार पडला. नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या संकल्पनेला आणि कलाकारांना उत्तेजित करण्यासाठी या सोहळ्याला दिग्दर्शक राज दत्त आणि अभिनेते जयंत सावरकर यांनी उपस्थिती दर्शवून चित्र मराठी प्लॅटफॉर्मचे संस्थापक मंदार काणे आणि सह संस्थापक समीर पौलस्ते यांच्यासह ‘चित्र मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मचे अनावरण केले.

या चित्र मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रमुख, संस्थापक मंदार काणे सांगतात, ‘लॉकडाऊनच्या काळात चित्रपटसृष्टी पूर्णतः ठप्प झाली त्यामुळे नवकलाकारांना उभे राहण्याची संधी कुठेतरी धूसर झाली. याच नवकलाकार आणि प्रतिभावान कलाकारांना उभारी देण्यासाठी हा नवीन प्लॅटफॉर्म घेऊन आम्ही येत आहोत. याशिवाय खेड्यापाड्यातील प्रतिभावान मुलांना पुढे आणण्यासाठी हा ओटीटी प्लॅटफॉर्म कधीही कमी पडणार नाही. एका वेगळ्या उंचीवर हा ओटीटी प्लॅटफॉर्म पोहोचवणे हा एकच उद्द्येश्य मनाशी ठेवून हा टप्पा पार करायचा आहे. प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट आणि आशयघन विषय देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतच आहोत. लवकरच नवनवीन कन्टेंट घेऊन तुमच्या भेटीला येऊ.

तसेच चित्र मराठी चे सह संस्थपाक समीर पौलस्ते एकूणच या प्लॅटफॉर्म बद्दल बोलताना असे म्हणाले की, ‘लोककला प्रोत्साहन देणे आणि
दिग्गज व नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध करून देणे हा या प्लॅटफॉर्मचा मानस आहे. शिवाय आपल्या मराठी चित्रपटसृष्टी डिजिटल व जागतिक पातळीवर पोहोचायला हवी हा एकमेव उद्देश्य घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालो आहोत. नवनवीन आशयघन विषय तुमच्या भेटीला आणू आणि तुम्हाला ते नक्कीच आवडतील अशी मी आशा करतो’.