अलंकापुरीत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठापना

478

श्रींचे मूर्तीवर होणार हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हरिनाम सप्ताहासह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे पाचवे पुष्प गुंफताना अलंकापुरीत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन मूल्यांची स्थापना श्रींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून होत असल्याचे विचार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी मांडले.
पाचव्या पुष्पाच्या निमित्ताने चैतन्य महाराज देगलूरकर यांनी सोहळ्यास शुभेच्छा देत सदिच्छा भेट दिली. त्यांच्या मनोगतात ते म्हणाले, ज्ञानेश्वर विद्यालयात स्थापन होणारी मूर्ती आनंद स्वरूप आहे. येथे आनंदाचा ठेवा ठेवला जाणार आहे. त्यामुळे येथे आनंदाचे वलय निर्माण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर सप्ताहाच्या पाचव्या दिवसाच्या निमित्ताने युवा कीर्तनकार डॉ. ह. भ. प. यशोधन महाराज साखरे यांची प्रवचन सेवा झाली. मानवी जीवनात संगतीचे फार महत्त्व आहे. मुले चांगली घडवायची असतील, तर त्यांच्या संगती कडे पालकांनी लक्ष दिलेच पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
सुश्राव्य भक्तिमय वाणीतून श्री संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी आपल्या कीर्तन सेवेतून ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाला पक्के स्वरूप मिळवून दितयाचे मत व्यक्त केले. नाथ महाराज व माऊलींचे मौलिक विचार त्यांनी यावेळी सांगितले. माऊलींची मूर्ती शाळेत बसवून संस्थेने विद्यार्थ्यांसमोर माऊलींचा आदर्श निर्माण केला असे सांगितले.
गायक व संगीतकार पं. कल्याण गायकवाड यांनी शास्त्रीय संगीत राग यमन आणि वारकरी परंपरा दोन्ही पद्धतीत ” हा नाम मंत्र व माऊलींचा अभंग अतीशय भावपूर्ण गाऊन श्रोत्यांना मंत्र मुग्ध केले. ज्ञानेश्वर विद्यालयाची माजी विद्यार्थीनी सुप्रसिद्ध गायीका कार्तिकी गायकवाड (पिसे) हिने ‘नामाचा गजर गर्जे भीमातीर’, ‘पांडुरंग नामी लागलासे ध्यास’ आणि एक ठुमरी दोन गौळणी सादर करून श्रोत्यांच्या टाळ्या घेत प्रतिसाद मिळविला. गौरव महाराष्ट्राचा विजेता कौस्तुभ गायकवाड याने संत एकनाथ महाराज यांचा ‘हरीचीया दासा’ हा अभंग व त्या सोबत ठुमरी गाऊन अधीकच रंग भरला. बाल गायीका कु. श्रद्धा साळुंके हिने ‘कानडा राजा पंढरीचा’ हा अभंग पहिल्यांदाच स्टेजवर गाऊन तीच्या सांगीतिक वाटचालीची दणक्यात सुरूवात केली. पं. कल्याण गायकवाड यांनी सलग दोन बहारदार गौळणी गाऊन भैरवी रागाने दोन तास बहारदार रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता झाली. मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनंतर श्रींचे मूर्तीवर हेलिकॉप्टर कांता वडगावकर, शकुंतला काळे यांच्या हस्ते पुष्प वृष्टी होणार आहे.