ब्राह्मण समाजाची स्वप्नपूर्ती, ब्राह्मण महासंघ ची वचन पूर्ती
पुणे प्रतिनिधी,
श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या पुतळ्याला जिन्या साठी ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत होते. महासंघाने स्वतःच्या निधीतून जीना उभारण्याची घोषणा केल्यावर तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ व भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महासंघाचे पदाधिकारी व मनपा प्रशासनासोबत बैठक आयोजित केली व 18 ऑगस्ट 2021 रोजी पुण्यतिथी दिनापर्यंत जींना उभारण्याची घोषणा केली. आज श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या 282 व्या पुण्यतिथी ला या जिन्याच्या कामाचे भूमिपूजन महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर,ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, मनपा सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महासंघाचे पदाधिकारी मनोज तारे, श्रीपाद कुलकर्णी, मदन सिन्नरकर, मयुरेश अरगडे, बाजीराव पेशवा समितीचे कुंदनकुमार साठे यांच्यासह विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सनई चौघड्याच्या निनादात मंगलमय वातावरणात महिलांनी फुगड्या घालून ह्या उभारणीचा सोहळा साजरा केला. यावेळी महापौरांच्या हस्ते बाजीराव पेशवा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले ” की अनेक अडथळे पार करून आज आपल्याला येथे जींना उभारण्यात यश येत आहे त्यामागे ब्राह्मण महासंघाचा पाठपुरावा महत्वाचा आहे. आपल्या राष्ट्रपुरुषांच्या स्मारक आणि पुतळ्यांची योग्य निगा राखली जावी व तेथील पावित्र्य जपले जावे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू.” संदीप खर्डेकर यांनी आपल्या संबोधनात ब्राह्मण महासंघाच्या कार्याचा गौरव केला व मराठेशाहीच्या इतिहासातील सोनेरी पान मुद्रांकित करणारे अपराजित योद्धा बाजीराव पेशवा यांच्या ह्या सुंदर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज जींना उभारणीस सुरुवात होत असून येत्या तीन दिवसात हे काम पूर्ण होईल असे सांगितले. तसेच हा केवळ ब्राह्मण महासंघाचा विषय नसून समस्त मराठी माणसाला अभिमान वाटावा असे कर्तृत्व गाजवीणाऱ्या बाजीरावांना एका समाजाच्या चौकटीत बंदिस्त करणे अन्यायकारक असल्याचेही खर्डेकर म्हणाले. आंनद दवे यांनी ब्राह्मण महासंघाच्या कार्याची माहिती दिली. तसेच यापुढील काळात ब्राह्मण महासंघ ब्राह्मण समाज भूषण असणाऱ्या सर्व महापुरुषांच्या स्मृती जतन करेल व ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षांसाठी सर्वतोपरी कार्य करेल असे ही ते म्हणाले.यावेळी वचनपूर्ती केल्याबद्दल मुरलीधर मोहोळ व संदीप खर्डेकर यांचा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.