पुणे,
‘मिश्र शिक्षण पद्धतीच्या संदर्भात, मुलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रविषयक ज्ञान यांची सुनिश्चिती’ या विषयावर आज पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. जी-20 समूहाच्या शैक्षणिक कृती गटाच्या पुणे येथे आयोजित चौथ्या बैठकीच्या निमित्ताने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. जगभरातील 20 देशांतून आलेल्या 50 प्रतिनिधींनी आजच्या या चर्चासत्रात भाग घेतला.
केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी या चर्चासत्रात बीजभाषण केले. महाराष्ट्र सरकारचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग सचिव अतुल कुमार तिवारी, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडाविषयक सुकाणू समितीचे सदस्य प्रा.मंजुल भार्गव, जी-20 सदस्य देशांचे प्रतिनिधी, विविध आंतरराष्ट्रीय संघटनांचे अधिकारी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारच्या शिक्षण विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारीदेखील या चर्चासत्रात सहभागी झाले होते.
यावेळी केलेल्या बीजभाषणात केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन यांनी भारताची जी-20 शैक्षणिक कृती गटाची अध्यक्षता याआधीच्या अध्यक्षतांच्या वेळी झालेल्या चर्चांमधील निष्पत्तीवर आधारित बाबींची उभारणी करून या चर्चा पुढे नेण्यावर केंद्रित कशा प्रकारे आहे याचा उहापोह केला. ते म्हणाले की, शिक्षण आणि कौशल्यविकास यांच्यातील दरी सांधून शिक्षणाची संपूर्ण परिवर्तनकारक क्षमता जाणून घेण्यातील अडथळे दूर करण्यावर तसेच शाश्वत विकास ध्येयांचा पाठपुरावा अधिक वेगवान पद्धतीने करण्यावर जी-20 समूहाचा अध्यक्ष म्हणून भारताने अधिक भर दिला आहे.
शिक्षणामुळे केवळ आकलनक्षमतेचाच नव्हे तर साक्षरता आणि संख्याशास्त्र या दोन्ही पायाभूत क्षमतांचा विकास होणे अपेक्षित आहे, तसेच त्याव्यतिरिक्त सारासार विचार करण्याचे कौशल्य आणि जटिल समस्यांवरील उपाय शोधणे यांसारख्या उच्च श्रेणीची आकलन क्षमता विकसित करणे हे शिक्षणाचे मूलभूत तत्व आहे. त्यामुळेच आपले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्येक व्यक्तीच्या सर्जनशील क्षमतेचा विकास करण्यावरच नाही तर सामाजिक, नैतिक आणि भावनिक क्षमता आणि स्वभाव या पैलूंवर देखील भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
लिहिता आणि वाचता येणे तसेच संख्याशास्त्रातील मूलभूत क्रिया करणे हा एक आवश्यक पाया आहे तसेच तो भविष्यातील शालेय शिक्षण आणि आयुष्यभरातील शिक्षणासाठी अपरिहार्य पूर्वअट आहे. पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक ज्ञान प्राप्त करणे हे शिक्षणातील आव्हान आहे असे जगभरातील विविध सर्वेक्षणांमधून दिसून येते. अशाप्रकारे सर्व बालकांसाठी पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक ज्ञान प्राप्त करणे हा आपल्या शैक्षणिक धोरणातील एक तातडीचा प्राधान्यक्रम आहे. त्यासाठी अनेक आघाड्यांवर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे आणि अल्पावधीत साध्य करता येतील अशी स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करणे देखील महत्वाचे आहे. ( प्रत्येक विद्यार्थ्याला तिसरी पर्यंत पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचे ज्ञान प्राप्त होईल) असे राजकुमार रंजन यांनी सांगितले.
आजच्या परिसंवादामुळे जी-20 सदस्य देश आणि इतर आमंत्रित देशांनी अवलंबलेली योग्य धोरणे आणि पद्धती ओळखण्यात कशाप्रकारे मदत होऊ शकते त्याबद्दल संजय कुमार यांनी आपले मत व्यक्त केले. या परिसंवादात होणारी गट चर्चा अभ्यासक्रमाशी संबंधित मुद्दे, शैक्षणिक दृष्टिकोन, शिक्षकांची क्षमतावृद्धी आणि इतर संबंधित घटक तसेच शिक्षणासाठी घरी अनुकूल वातावरण तयार करण्यामध्ये पालकांची भूमिका या विषयांवर लक्ष केंद्रित करेल. पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ज्ञान सुनिश्चित करणे या विषयावरील समवर्ती प्रदर्शनावरही त्यांनी प्रकाश टाकला. तसेच पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान , डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य या विषयावरील समवर्ती प्रदर्शनाचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि उपस्थित प्रतिनिधी आणि इतर अधिकारी या प्रदर्शनांना दोन सत्रादरम्यानच्या वेळेत भेट देणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या संकल्पनेशी संबंधित ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ज्ञान’’ या विषयावर युनिसेफच्या वतीने तपशीलवार सादरीकरण करण्यात आले. यानंतर प्रा. मंजुल भार्गव यांनी जी -20 देशांमधील मुलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रविषयक ज्ञान या विषयावर सादरीकरण केले. मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र यामध्ये गेल्या 20 वर्षात झालेल्या प्रगतीचे आणि शिक्षणाच्या सुलभतेमध्ये ज्याप्रकारे झपाट्याने वाढ झाली आहे, त्याची त्यांनी प्रशंसा केली.
या बैठकीअंतर्गत आज तीन वेगळ्या सत्रांचे आयोजन केले होते. पहिल्या सत्रात संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, मिश्र पद्धतीने मूलभूत ‘साक्षरता आणि संख्याशास्त्र शिकवण्याचे शिक्षण, दृष्टिकोन आणि अध्यापनशास्त्र’ या विषयावर चर्चा झाली. त्यामध्ये स्पेन, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिकेतील सदस्य चर्चेत सहभागी झाले.
यानंतर दुसरे सत्र झाले. ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचा अभ्यास घरामध्ये राहून (होम लर्निंग) करताना पालकांची, मुलांची काळजी घेवून त्यांना सांभाळणारे आणि समुदायातील सदस्यांच्या भूमिका, या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये सामाजिक-भावनिक कौशल्ये आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण, याविषयावर वक्त्यांनी विचार मांडले. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव अदिती दास राउत यांच्या अध्यक्षतेखाली या चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी अमेरिका आणि चीनचे प्रतिनिधी गट चर्चेत सहभागी झाले.
तिसरे सत्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या अध्यक्षा निधी छिब्बर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. हे चर्चासत्र बहुभाषिकतेच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रासाठी शिक्षकांचे क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण यावर केंद्रित होते. या पॅनेलमध्ये ब्रिटन, आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (ओईसीडी), सौदी अरेबिया आणि युनिसेफचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धतींचे प्रदर्शन करणाऱ्या बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. युनिसेफ, एनएसडीसी, एनसीईआरटी, नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियन नॉलेज सिस्टम्स डिव्हिजन (आयकेएस) आणि स्टार्टअप उपक्रमांसह 100 हून अधिक जण या प्रदर्शनात आपले योगदान सादर करतील. हे प्रदर्शन आज – 19 जून 2023 वगळता इतर दिवशी म्हणजे 17 ते 22 जून 2023 या कालावधीत स्थानिक संस्था, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांसाठी खुले आहे.