अनिल चौधरी,पुणे
स्वराज्यासाठी बलिदान देणारे सरदार कन्होजी जेथे यांच्या नावाचा तसेच वंशज असल्याचा कोणीही गैरवापर करू नये अन्यथा कायदेशीर कडक कारवाई करण्याचा इशारा सरदार कान्होजी जेथे यांचे मूळ वंशज रणवीर जेथे यांनी दिला आहे.
स्वराज्यासाठी वतनावर तुळशीपत्र ठेवणारे सरदार कान्होजीराजे वैधे म्हणजे इतिहासातलं एक मानाचं पान. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी महाराजांना ज्या शिलेदारांची मजबूत साथ लाभली, त्यापैकी कान्होजी एक. कान्होजी जेधे हे शहाजी महाराजांच्या सैन्यामध्ये शूर सैनिक होते. स्वराज्याकामी मदत करण्यासाठी शहाजीराजांनी त्यांना शिवरायांसोबत धाडते आणि जेथेंनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली. आजही भोर तालुक्यातील कारी येथील जेधे वाडा आपल्याला कान्होजींच्या पराक्रमाची साक्ष देतो. 1996 मध्ये युती सरकारच्या काळात हा वाडा राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करण्यात आला. त्यानंतर 2014 मध्ये पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून या वाड्याचे जतन, संवर्धन व पुनर्बाधणीचे काम करण्यात आले. आता याच वाड्यात जेधे यांचे वंशज राहतात. जेधे यांच्या वंशावळीसंदर्भातील ऐतिहासिक पुरावे व कागदपत्रे उपलब्ध आहेत. ही वंशावळ निर्माण करताना मोडीतील वंशावळीचा तसेच शंकर श्रीकृष्ण देव, स. ग. जोशी, वि. का. राजवाडे यांनी प्रकाशित केलेल्या वंशावळीचा आधार घेण्यात आला आहे. वंशावळीत केवळ कारीतील थोरल्या पातीचा (शिक्केकरी) वंशवेल शेवटपर्यंत दाखविला आहे. त्यांच्या इतर शाखा या नाटंबी, आंबवडे, चिखलगाव, वडतुंबी, तळेगाव ढमढेरे याठिकाणी नांदत आहेत. याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही शाखेचा या वंशावळीत उल्लेख सापडत नाही. तथापि, कान्होजी जेधे यांच्याशी कोणतेही रक्ताचे नाते नसताना केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आपण त्यांचे वंशज असल्याचा खोटा दावा दौंड, पारगाव येथील जेधे आदी मंडळींकडून सुरू आहे. प्रत्यक्षात येथील जेधे यांचा कान्होजी जेधे यांच्या घराण्याशी कोणताही संबंध नाही. असलेच तर केवळ नामसाधर्म्य (आडनाव) आहे. मुळात ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये वा साधनांमध्येही कुठेही याबाबत नोंद नाही. किंवा तसा कोणताही पुरावा या मंडळींकडे दिसत नाही. मात्र, तरीदेखील चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयन ते करीत आहेत. लोकभावनेशी अशा प्रकारे खेळणे, ही अत्यंत अयोग्य बाब आहे.
लोकांना खरा इतिहास समजला पाहिजे, ही माझी प्रामाणिक भावना आहे. कान्होजी जेधे यांचे वंशज हे कारी येथील जेधे वाड्यात राहतात, हे इतिहास संशोधक, अभ्यासक, इतिहासप्रेमी जाणतात. मात्र, सर्वसामान्य लोकांच्या भावनेचा गैरफायदा घेऊन त्यांची नैतिक फसवणूक केली जात आहे. कान्होजी जेधे यांच्या नावाचा असा वापर करणे, कोणतेही पुरावे नसताना खोटा इतिहास कथन करणे, हे सर्वथा निषेधार्ह आहे. त्यामुळे याबाबत आपण संबंधितांना कायदेशीर नोटीसही पाठविणार आहोत असेही रणधीर जेधे, सरदार कान्होजी जेधे यांचे 13 वे वंशज यांनी सांगितले.