गिरीश भोपी, जुनेद तांबोळी पनवेल प्रतिनिधी
मुरुड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद तांबोळी यांचा मृतदेह सिमरन मोटर्सच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रेल्वे रुळावर सापडला. त्यांचा अपघातात होता की आत्महत्या अथवा घातपात, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ते खांदा कॉलनी येथे वास्तव्यास होते.
आज दुपारी एका रेल्वे प्रवाशाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पनवेल आणि खांदेश्वर रेल्वे स्टेशन दरम्यान सिमरन मोटर्सच्या पाठीमागील बाजूस अज्ञात इसमाचा मृतदेह पडला असल्याच्या माहितीवरून रेल्वे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक केसरकर आणि सहकाऱ्यांनी धाव घेतली. घटनास्थळी एका इसमाचा मृतदेह पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद तांबोळी यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.
विनोद तांबोळी हे रायगड जिल्ह्यातील मुरुड पोलिस ठाण्याचे प्रमुख अधिकारी होते. आजारी असल्याचे कारण देत ते कालपासून दोन दिवसाच्या रजेवर गेले होते, अशी माहिती रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दै. निर्भीड लेखशी बोलताना दिली.
तांबोळी यांना रेल्वेची धडक बसल्याने त्यांना अपघात झाला असल्याचे रेल्वे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले असले तरी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातून तांबोळी यांनी आत्महत्या केली असावी असाही मतप्रवाह सुरू झाला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. आज, शनिवारी दुपारी 4:30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
तांबोळी हे 2011 च्या दरम्यान परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्तांच्या पनवेल कार्यालयात पोलिस हवालदार होते. त्यानंतर खाते अंतर्गत परीक्षा देवून सहाय्यक पोलिस निरीक्षक पदापर्यंत पोहचले होते. सध्या ते मुरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.
पनवेल जिल्हा उपरुग्णालयाचे डॉ. फालके यांनी शवविश्चेदन केले. पुढील तपास पनवेल रेल्वे पोलिस करत आहेत.