महाराष्ट्रातील पहिल्या जागतिक बालकिर्तनकार महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

744

सागर बोदगिरे, पुणे

 “निरपेक्ष भक्ती आणि निरागस बालमन यांचा संबंध खूप जवळचा आहे. रोजच्या जीवनात माणूस जे काम करतो तीच भक्ती असते. त्यामुळे मनुष्याने आपले प्रत्येक कर्म लहान बालकासारखे निरपेक्ष आणि स्वच्छ हेतूने करावे” असा जीवन जगण्याचा सोपा मार्ग हभप बालकिर्तनकारांनी जागतिक बालकीर्तनकार महोत्सवाच्या माध्यमातून पुणेकरांना सांगितला.

शिवस्वराज प्रतिष्ठान वानवडी आणि कुसुमवंदन नाट्य संस्था यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच जागतिक बालकिर्तनकार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या किर्तनातून बालकिर्तनकारांनी भक्तांना आयुष्याचे सार सांगितले. हा महोत्सव शनिवार, रविवार आणि सोमवार (ता. २१ ते २३) दरम्यान वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे पार पडला. या तीन दिवसीय महोत्सवात वय वर्षे ११ ते १५ वयोगटातील बालकिर्तनकारांचा समावेश होता. यावेळी मा.आमदार महादेव बाबर व वारकरी संप्रदायातील भाविकांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती. महोत्सवाचे व्यवस्थापन संगीतरत्न हभप बाळासाहेब महाराज कुलकर्णी, हभप दीपक महाराज सुद्रिक, हभप प्रकाश खतोडे, हभप सुनीता ताई आंधळे यांनी केले होते.

“ज्याप्रमाणे लहान मुले ही देवाघरची फुले मानली जातात, त्यांचे मन निर्मळ आणि निष्पाप असते. त्याचप्रमाणे भगवंताची निर्मळ आणि निरपेक्ष मनाने भक्ती केली तर भगवंत नक्की भेटतो” असा सूर या बालकिर्तनकारांच्या भक्तिरसातून उमटला.

संत महात्म्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राला थोरा मोठ्यांपासून तरुणांपर्यंत भक्तीचा मार्ग सांगणारे अनेक कीर्तनकार लाभले. परंतु बालकिर्तनकारांच्या निरागस भक्तीची रूपे महाराष्ट्राला खूप कमी अनुभवायला मिळाली. ही कमी भरून काढण्यासाठी आणि निरागसतेतून भक्तिरसाचा संदेश देण्यासाठी शिवस्वराज प्रतिष्ठान वानवडी संस्थेचे आयोजक अमित शेलार आणि कुसुमवंदन नाट्य संस्थेचे संयोजक प्रमोद रणनवरे यांनी महाराष्ट्रात प्रथमच जागतिक बालकिर्तन महोत्सवाचे आयोजन करण्याचा उपक्रम हाती घेतला.

या तीन दिवसीय महोत्सवात शिवचरित्रकार बालकिर्तनकार हभप भैय्युजी महाराज झेंडे, हभप स्वातीदिदि बडे, हभप यशवंत महाराज कातळे, हभप खुशालीताई उगले, हभप भक्ती महाराज चव्हाण, हभप अक्षदाताई चोळके, हभप निकितादिदि भांगरे, बालकिर्तनकार शिवचारित्र्य व्याख्याते हभप घनशाम महाराज आर्वीकर, हभप बाळकृष्ण महाराज डांगे तर हभप महादेव महाराज घोडके, हभप प्रांजलीदिदि जाधव, हभप चैतन्य महाराज राऊत, हभप गायत्रीदिदि घोडके, हभप अविनाश महाराज वाघ आणि हभप माईसाहेब महाराज जळगांवकर या बालकीर्तनकारांचा सहभाग होता.

तीन दिवसांच्या भक्तिमय वातावरणात, निरागस आणि निर्मळ मनाच्या बालकांच्या मुखातून आयुष्याची कथा ऐकताना भक्तजन भारावून गेले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून ज्येष्ठ रसिक भक्तांना किर्तनांची वेगळी मेजवानी अनुभवायला मिळाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आयोजक अमित शेलार यांना यापुढेही अनेक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन दिले. तसेच कार्यक्रम समारोपाच्या दिवशी सर्व बालकीर्तनकारांचे आणि उपस्थित भाविकांचे आयोजक अमित शेलार यांनी आभार मानले.