पतीच्या प्रेयसीचा खून करणाऱ्या दोन महिलांना अटक ; १८ तासाच्या आत खुनाचा गुन्हा उघड करण्यात उरण पोलिसांना यश

762

गिरीश भोपी, उरण

पतीचे दुसऱ्या महिले बरोबर असलेल्या अनैतिक सबंधातून पत्नी व मुलीने मित्राच्या संगनमताने पतीच्या प्रेयसीचा खून करून तो चिरनेर परिसरात टाकून दिला होता. उरण पोलिसांनी शिताफीने तपास करीत १८ तासांच्या आत खुनाचा उलगडा करीत दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. पुढील तपास सुरू आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर येथील बापूजीदेव परिसरात २५ ते ३० निर्घृणपणे वार केलेल्या एका महिलेचा मृतदेह सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता सापडला होता. आरोपींनी कोणतेही धागेदोरे सोडले नसल्याने पोलिसांना आव्हान होते. याबाबत उरण पोलीस ठाणे गु. र. क्र. ५८/२०२० भा.द.वि. कलम ३०२,२०१ अन्वये अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील महिला आरोपी तबसुम मुक्तार अली संग्राम (४५),रुसार मुक्तार अली संग्राम(२१)
हिचा पती यांनी मयत महिला कल्पना उर्फ जया तुकाराम घाणेकर(३४) हिच्याबरोबर प्रेमसबंधातून विवाह केला होता. यामुळे कल्पना हिचा प्रियकर व त्याची पहिली पत्नी यांच्यात अनेकवेळा वादावाद झाले होते. नेहमीच होणाऱ्या भांडणाला कारणीभूत ठरणाऱ्या पतीच्या प्रेयसीचा काटा काढण्याचे पहिल्या पत्नीने ठरविले. प्रियकराची पहिली पत्नी, मुलगी व मुलीचा मित्र यांनी संगनमत करून मयत कल्पना उर्फ जया घाणेकरला मानसरोवर येथून घेऊन चिरनेर येथील निर्जनस्थळी आणून तीक्ष्ण हत्याराने निर्घृणपणे २५ ते ३० वार खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह ओळखू नये म्हणून चिरनेर परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देऊन पसार झाले होते.
कोणतेही धागेदोरे हाताशी नसल्याने आरोपींना पकडणे आव्हानात्मक होते. परंतु एसीपी विठ्ठल दामगुडे, वपोनी जगदीश कुलकर्णी, गुन्हे पोनी अतुल आहेर, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि काठे, सपोनि कावळे, सपोनि वृषाली पवार, पोनी चव्हाण या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मयत महिला कल्पना उर्फ जया घाणेकर हिची ओळख पटवून शहाबाजगाव बेलापूर परिसरात राहणारी आई व मुलगी यांना ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखविल्या नंतर त्या दोघींनी एका इसमाच्या साथीने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यानंतर या गुन्ह्याप्रकरणी त्यांना मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता ७ दिवसाची पोलीस कस्टडी दिली असून आरोपीचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.