Saturday, June 14, 2025
Google search engine
HomeMalhar Newsकोरोनाच्या दोन्ही रूग्णांवर उपचार सुरू ,नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी; डाॕ.म्हैसेकर

कोरोनाच्या दोन्ही रूग्णांवर उपचार सुरू ,नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी; डाॕ.म्हैसेकर

पुणे प्रतिनिधी,

पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आलेले आहे. हे रुग्ण नायडू हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. तर दुसऱ्या रुग्णांमध्ये अद्याप लक्षणे आढळून आलेली नाही. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. तथापि नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी,अशी माहिती विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
अधिक माहिती देताना डाॕ.म्हैसेकर म्हणाले,दोन रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यांनी यापूर्वीच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी प्रवास केला, त्याची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही व्यक्ती फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दुबई येथे ४० जणांचे ग्रुप सोबत फिरायला गेले होते आणि ते एक मार्च रोजी भारतामध्ये परत आलेले आहे. या दोन व्यक्तीपैकी एका व्यक्तीला त्रास झाल्यामुळे त्यांनी दिनांक ८ मार्च रोजी डॉक्टर कडून आपली तपासणी करून घेतली.त्यावेळी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे. दुबई हे ठिकाण केंद्र शासनाने जाहीर केलेल्या बाधित ठिकाणांचे यादीमध्ये नसल्यामुळे संशयित रुग्ण १ मार्चला भारतात परत आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आले नाही. या दोन्ही व्यक्तीच्या भारतात परत आल्यानंतर संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे.या दोन्ही रूग्णांचे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच त्यांच्या कार्यालयीन ठिकाणी असलेले अधिकारी-कर्मचारी यांचा त्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत रूग्णांच्या कुंटुंबातील ३ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
या दोन्ही व्यक्तींसोबत दुबई येथे गेलेल्या एकूण ४० व्यक्तींची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून हे विविध जिल्ह्यातील नागरिक असल्याने संबंधित जिल्हा प्रशासन त्यांना संपर्क करून त्यांची तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करत आहे. या दोन्ही व्यक्तींनी ज्या व्यक्तीचे टॅक्सीने मुंबई वरून पुण्याला प्रवास केला आहे, अशा व्यक्तीची माहिती घेण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना देखील काल रात्री दवाखान्यांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे.
या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी एकूण पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलिस आणि दोन्ही महानगरपालिकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पथकाद्वारे हे दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येईल असेही ते म्हणाले.
आजपर्यंत दोन्ही महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण २१ ठिकाणी २०७ बेड अतिदक्षता विभागाच्या सुविधा तसेच विलगीकरण कक्षासहित तयार करण्यात आलेल्या आहेत. इंडियन मेडीकल असोसिएशन तर्फे जिल्हयातील सर्व डॉक्टरांना आवाहन करताना ते म्हणाले, त्यांच्याकडे आलेल्या रूग्णांची तपासणी करत असतांना परदेशातून भारतात आलेल्या रूग्णांची माहिती वेगळयाने ठेवावी,असेही शेवटी ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम,पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, उपायुक्त प्रताप जाधव, आरोग्य उप संचालक डॉ. संजय देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर,डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उप विभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख, सचिन बारावकर, डॉ. मितेश घट्टे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!